शैक्षणिकवर्ष २०१७-१८ हे निगडी केंद्राचे संगीत वर्ष होते. त्या निमित्ताने “संगीत संमेलनाचे” आयोजन केले होते.
पं. रामदास पळसुले अध्यक्षपदी होते, तर प्रसिद्ध शास्त्रीय गायक – श्री. समीर दुबळे उपाध्यक्ष होते.
डॉ. विकास कशाळकर यांनी संमेलनाला मार्गदशन केले. डॉ. पौर्णिमा धुमाळे (गायन), पं. प्रमोद मराठे (संवादिनी), डॉ.पं.नंदकिशोर कपोते (नृत्य) ,राष्ट्रीय कीर्तनकार – चारुदत्त आफळे , डॉ. सलील कुलकर्णी (दैनंदिन जीवनातील संगीत) , पं. मिलिंद तुळणकर (जलतरंग-संतूर) ,पं.प्रमोद गायकवाड (सुंद्री,सनई) आदी मान्यवरांनी संगीत सादरीकरणातून, विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
याद्वारे विद्यार्थ्यांना, संगीत क्षेत्रातील क्षितिज काय असावे, हे समजण्यास मदत झाली. शास्त्रीय गायन , सुगम संगीत , भरतनाट्यम , कथक , संवादिनी , तबला , तालवाद्य , प्रबोधन गीते आदी विषयांच्या बारा समांतर कार्यशाळा विद्यार्थ्यांनी अनुभवल्या.
मुक्तिसोपान विभाग २००५-०६ या शैक्षणिक वर्षात सुरु झाला. २००५ सालची “दिवाळी पहाट”, हि पहिली संगीत सभा. तेव्हापासून अव्याहतपणे प्रतिवर्षी धनत्रयोदशीला “दिवाळी पहाट” या शास्त्रीय – उपशास्त्रीय संगीत सभेचे आयोजन करण्यात येते.
सुश्री. आरती अंकलीकर टिकेकर, सुश्री. सानिया पाटणकर, पं. शौनक अभिषेकी, श्री. कौस्तुभ कांती गांगुली, गायिका अभिनेत्री अस्मिता चिंचाळकर आदी संगीत क्षेत्रातील मान्यवरांनी या दिवाळी पहाट सभेचे व्यासपीठ भूषविले आहे.
गेल्या वर्षी म्हणजे नोव्हेंबर २०१९ मध्ये मुक्तिसोपान सदस्या – स्वरेशा पोरे कुलकर्णी, यांनी सादर केलेली दिवाळी पहाट संगीत सभा म्हणजे मुक्तिसोपानच्या शिरपेचातील मानाचा तुरा.