‘वेदांत ते विज्ञान’ हा प्रबोधिनीचा शैक्षणिक विचार आहे. सांस्कृतिक परंपरेशी नाळ जोडणाऱ्या उपक्रमांबरोबरच आधुनिक काळातील ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान यांचा स्विकार करत आधुनिक तंत्रज्ञानही विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे यासाठी संस्था नेहमीच कार्यरत असते. भारतात संगणक क्रांतीचा उदय होत असतांनाच काळाची पाऊले ओळखून निगडी केंद्रात १९८६ साली मुलभूत संगणक प्रशिक्षणाला सुरुवात झाली. माहिती तंत्रज्ञानाने जग गेल्या काही वर्षात झपाट्याने बदलत आहे. बदलांचा हाच वेग पत्करत १९९९ सालापासून स्वतंत्रपणे संगणक विभागाची स्थापना करण्यात आली. XT स्वरूपातील एका संगणकाच्या माध्यमातून सुरु झालेला संगणक विभाग, आज सुमारे ५० अद्ययावत संगणकाच्या सहाय्याने विद्यार्थी, पालक व परिसरातील नागरिकांसाठी विविध कालानुरूप आवश्यक अभ्यासक्रमांची योजना राबवीत आहे.
विद्यार्थी प्रशिक्षणाबरोबरच २००० सालापासून पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील शाळांमध्ये व्याख्याने, कार्यशाळा , स्पर्धा इ. विविध उपक्रमांच्या माध्यमातून संगणक साक्षरतेचा प्रचार व प्रसार केला जात आहे. संगणक साक्षरतेचे जाळे सर्वदूर विणले जावे या हेतूने सुरुवातीला पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील शाळांसाठी आंतरशालेय संगणक स्पर्धा घेण्यात आली. त्यांनंतर टप्प्या टप्प्याने त्यात वाढ करत २००७ सालापासून विद्यार्थी व अध्यापकांसाठी ‘जिल्हास्तरीय संगणक बुद्धिमत्ता स्पर्धेचे’ आयोजन केले जात आहे.
या सर्व कामांची दखल घेत २००४ साली केंद्र शासनाचा संगणक साक्षरता उत्तमता पुरस्कार (Computer Literacy Excellence Award) विभागास प्राप्त झाला आहे.
विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्राचे प्रशिक्षण देत विशेष रुची असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २०१० सालापासून संगणकाधारित विकसन प्रकल्प सुरु आहे. संगणकातील आधुनिक कौशल्य आत्मसात करण्याबरोबरच स्वत:च्या कौशल्ये वाढीसाठी व विविध विषयांचे आकलन व्हावे यासाठी संगणकाचा साधन म्हणून योग्य उपयोग कसा करावा हा या प्रकल्पाचा मुख्य हेतू आहे.
प्रकल्पाची सुरूवात -२०१० पासून
उद्दिष्ट : निव्वळ आधुनिक प्रणाली व पॅकेजेस वापरण्यापुरते प्रशिक्षण सुसंदित न ठेवता जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात विद्यार्थ्याने पाऊल ठेवले तरी त्याला संगणकाचा वापर प्रभावीपणे करता आला पाहिजे. त्याचबरोबर त्या त्या क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी संगणक हे एक प्रमुख साधन म्हणून तो वापरू शकला पाहिजे यासाठीचे पायाभूत प्रशिक्षण देणे व लहान वयातच विद्यार्थ्यांची मनोभूमिका तयार करणे या उद्देशाने हा प्रकल्प सुरु केला.
– इयत्ता ५ वी ते ८ वी मराठी व इंग्रजी माध्यमातील विशेष रुची असलेल्या निवडक विद्यार्थ्यांचा सहभाग
– प्रत्येक वर्गाचे प्रकल्पातून प्रशिक्षण व त्यातून अनेक व्यवहारोपयुक्त प्रकल्पांची निर्मिती
– प्रकल्पांतर्गत इयत्ता इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांद्वारे गणित विषयावरील इयत्ता ५ वी ते ९ वी च्या शैक्षणिक मोबाईल अॅप ची निर्मिती.
उद्दिष्ट : शाळा-शाळां पर्यंत संगणकाचे आधुनिक ज्ञान पोहचावे, विद्यार्थ्यामधील संगणक कौशल्ये व तार्किक क्षमता आजमावता याव्यात, समाजामध्ये संगणक साक्षरता वाढावी, संगणकाचा वापर योग्य ठिकाणी करता यावा.
– १८ वर्षांपासून स्पर्धेचे यशस्वीरीत्या आयोजन व प्रतिवर्षी साधारण ५० शाळा व २००० बाह्य विद्यार्थ्यांचा सहभाग