Contact +91 20 27168000
Contact +91 20 27168000

होती अनेक हृदये जरी एकरूप …

uniform hearts

आपली सेवावाहिनी सुरू झाल्यापासून नित्य नवा अनुभव कार्यकर्त्यांना येतोय. अनेक जण प्रत्यक्ष शाळेत येऊन सकाळी ९ ते रात्री ९ … इतकं काम करत आहेत अर्थात सोशल डिस्टन्सिंग , मास्क , सतत सॅनिटायझेशन आदी नियम पाळूनच. अगदी न दमता न थकता. सगळे जण एकमेकांपासून दूर राहून काम करत असलो तरी मनाने अधिकच जवळ येत आहोत हा अनुभव पावलोपावली येतोय. सगळ्यांच्याच ध्यानीमनी प्रबोधिनी. त्यामुळे रात्री साडे नऊ नंतर घरी गेल्यावर सुद्धा कायप्पा वर चर्चा चालूच (WhatsApp chatting) … आनंद दादाने मुद्दा मांडला …. जे लोक जेवणाचा डबा किंवा औषधे वगैरेंची होम डिलिव्हरी द्यायला जातात त्यांना डिस्पोजेबल मास्क आणि ग्लोव्हज द्यायला हवेत.

आपण आपली स्वतःची जास्त काळजी घेत काम करायला हवं. आपण स्वतः जर सुरक्षित , फिट राहिलो तरच काम उत्तम पद्धतीने करू शकू. अनघाताईने लगेच उत्तर दिले की बरोबर आहे , उद्या सकाळी याबद्दल बोलूच. आणि याच वेळी समांतर … दुसऱ्या संभाषणात … अनघाताईला अद्वैत दादाच्या चॅटवर तीन चार मेसेज … उद्या आपला एक माजी विद्यार्थी १०० N 95 मास्क आणि एक बॉक्स डिस्पोजेबल ग्लोव्हज घेऊन येईल. ठेवून घे. अनघाताई नि:शब्द …. आत्ताच तर याबद्दल बोलणे चालू होते , याला कसे कळले की कशाची गरज आहे ते ? की परमेश्वरानेच व्यवस्था करून ठेवली ? दोन्ही संभाषणांची वेळ इतकी जुळावी ? हा एक ईश्वरी संकेत किंवा आपल्या या कार्याला मिळालेला आशीर्वाद आहे का ? मनात असंख्य प्रश्न … आणि उत्तर मिळाले. हे राष्ट्रकार्य आहे ज्याला सगळे जण हात लावत आहेत. म्हणूनच तर ये हृदयीचे ते हृदयी न सांगता पोहोचतंय. प्रबोधिनी एक कुटुंब आहे. त्यामुळे एकमेकांना छान समजून घेतलं जातंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण एक चांगलं काम उभं करतोय आणि अशा विधायक कामांना परमेश्वर नेहमीच साथ देतो.

त्यामुळेच तर आज म्हणायला गेलं तर स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्व कार्यकर्ते आनंदाने काम करत आहेत. निव्वळ प्रशासन , सरकार करेल तेवढे काम उघड्या डोळ्यांनी बघत मुक्तपणे टीकाटिपण्णी करण्यापेक्षा हे सर्व प्रबोधक प्रत्यक्ष लढाईत उतरले आहेत. हे तर कोविड योद्धेच … प्रबोधिनीचे विचार मनात साठवत कृतीतून उतरवत समाजात एक आदर्श प्रस्थापित करत आहेत.

शब्दांकन : शीतल कापशीकर
सेवावाहिनी :
8390458155

Leave a Reply