ज्ञानप्रबोधिनी, निगडी केंद्राच्या वतीने सुरु असलेल्या सेवावाहिनीची दखल mpcnews.in या वृत्तपत्राने घेतली आहे.
कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ज्ञानप्रबोधिनी, निगडी केंद्राच्या वतीने ‘सेवावाहिनी’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून कोविड रुग्ण व त्यांच्या कुटुंबासाठी विविध मदत पुरवली जात आहे. यामध्ये टेलिमेडिसीन, कोविड रुग्णांना मोफत डबे पोहोचविणे, औषधे पोहोचविणे, रक्त आणि प्लाझ्मा, ॲन्टीजेन चाचणी, आरटीपीसीआर चाचणी, सशुल्क होम सॅनिटायझेशन, माहितीपर वेबिनार, मोफत ऑनलाईन प्राणायाम वर्ग अशा वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश आहे.
सेवा वाहिनीच्या अनघा देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन मे रोजी सेवावाहिनी सुरू झाल्यापासून आतापर्यंत तिनशे जणांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. सेवा वाहिनीसाठी ४१ डॉक्टर्स (ॲलोपॅथी ८, आयुर्वेदिक १२, होमेओपॅथिक ६, मानसिक सल्लागार ९, फिजिओथेरपिस्ट ५, योगतज्ञ २, आहार तज्ञ १) तसेच, ११ वैद्यकीय समन्वयक, १५ कार्यालयीन कामकाज बघणारे सदस्य, ४ डबे भरणे सदस्य, २१ कोअर कमिटी सदस्य, आणि ३० अन्नदूत असे शंभरहून अधिक स्वयंसेवक सेवा पुरविण्याचे काम करत आहेत.
यामाध्यमातून ७७ जणांनी वैद्यकीय सल्ला घेतला आहे, १२ जणांना प्लाझ्मा मिळवून देण्यात यश आले तर ४५ रुग्णांना आयुर्वेदिक तज्ञांच्या मार्गदर्शना खाली तयार झालेले जेवण घरपोच दिले जात आहे. आजपर्यंत ३५०हून अधिक डबे पुरविले आहेत. चार जणांनी सशुल्क होम सॅनिटायझेशन सेवेचा लाभ घेतला आहे. फिजिओथेरपी व्दारे पोस्ट कोविड रिकव्हरी साठी सुद्धा अनेकजण मदत घेत आहेत. याशिवाय काहींनी मन मोकळं करणे व व्यक्त होण्यासाठी सेवावाहिनीचा लाभ घेतला आहे. असे, देशपांडे यांनी सांगितले.
COVID Helpline: 8390458155