प्रबोधिनीत सध्या मोठं काम सुरू आहे. अनेक युवक युवती , पालक महासंघ सगळे मिळून ही धुरा समर्थपणे पेलत आहेत , खरंच आपण पण काहीतरी करायला हवं असं वाटतंय , मी काय करू शकतो/शकते ? ….. या आशयाची वाक्यं हल्ली अनेकदा कायप्पावर वाचायला मिळत आहेत. एव्हाना आपलं काम , आपले कामासाठी आवाहन फॉर्म सगळंच viral झालंय. कोण – कसं – किती – काय योगदान देऊ शकतं हे सांगणारे हे अनुभव ……
“काय ग तासन् तास एका जागी कशी बसू शकतेस तू ?” …. एका व्यक्तीने अगदी सहज केलेला प्रश्न …. यावर सईताई अगदी भावूक झाली आणि म्हणाली … खरं तर मलाही हाच प्रश्न होता की मी बसू शकेन का एका जागी स्थिर ? पण मग आठवलं की जेव्हा Helpline या नावाखाली नंबर दिलेले असतात आणि अनेक गरजू तिथे फोन करतात तेव्हा either ते व्यस्त येतात किंवा लागत तरी नाहीत. आणि जेव्हा संपर्क होतो तेव्हा अनेकदा ती गरज संपून गेलेली असते. आपल्याकडे असं व्हायला नको. सेवावाहिनी खरोखर सेवा देणारी ठरली पाहिजे. गेले काही दिवस मी आपल्या सेवावाहिनीवर येणारे फोन घेतीये , संबंधित व्यक्तींना त्यांच्याशी जोडून देतीये. बरं झालं ग ताई फोन लगेचच लागला आणि तू उचललास सुद्धा हे भारी वाक्य ऐकण्यासाठी मी इथे बसते. आजकाल आम्ही उपचार चालू असणाऱ्या पेशंट्सची चौकशी पण सुरू केलीये. हा फोन आल्याचा त्यांच्या आवाजतला आनंद मला ऐकू येतो आणि फोनच्या पलीकडचा चेहरा सुद्धा आपोआप डोळ्यासमोर येतो. खूपच वेगळं feeling आहे ते. हेच अनुभवण्यासाठी मी इथे बसते. आता या सेवावाहिनी प्रवाहातली मी एक धारा आहे , तिला वाहती ठेवण्यासाठी मी तासन् तास इथे बसते. फोनची रिंगटोन आता वाजेलच हे मला माझ्याही नकळत जाणवायला लागलंय. ही टेलिपॅथी अनुभवण्यासाठी मी इथे बसते. एक ना दोन हजारो कारणं देऊ शकत होती ही मुलगी. आणि राहून राहून असं वाटत होतं की कित्ती झोकून देऊन , मनापासून , आहे त्या कामातला असा आनंद मिळवत , सेवाभावी वृत्तीने , स्वतःलाच कृतार्थ समजत काम करत आहेत कार्यकर्ते !! 🙏🏻
असाच अजून एक अनुभव …. सायलीताई … मागच्या महिन्यात स्वतः पॉझिटिव्ह होती. घरातच तिची आई आणि आज्जीसुद्धा पॉझिटिव्ह … त्यातून बाहेर येतीये तोवर जवळच्या नात्यातील एक भाऊ ऍडमिट. पण ही पठ्ठी इथे दिवस दिवस काम करतीये. परवा अनघाताई तिला अक्षरशः रागावली आणि म्हणाली की आता घरी जा बरं. तर यावर सायलीताईचे विनम्र उत्तर …. अग डॉ. पराग पाटील बघ , किती आणि कशा परिस्थितीत काम करत आहेत. ते जर करू शकतात तर मी का नाही ? असे म्हणून तिने डॉक्टरांचा आलेला मेसेजच दाखवला👇🏻
“Actually I’m at bhuswal..
I cme today morng here..
My uncle is covid positiv n is in critical stage..
Let’s hope better..
If he is recvring den I will b in pune by Monday..
Bt no issue
U can call me anytime regarding patients..”
Dr. Parag Patil
आणि म्हणाली …. यांच्याकडे बघून मला मी एवढा वेळ थांबते याचं काहीही वाटत नाही ग. सायलीताईसाठी आपलं काम करताना किती मनापासून करावं याचा हा खूपच मोठा अनुभव होता… 🙏🏻
असे स्वतःला समृद्ध करणारे अनुभव कार्यकर्त्यांना येताहेत. आपण सर्वजण मिळून या संकटाचे लवकरात लवकर निवारण व्हावे यासाठी प्रार्थना , वंदना करत आहोत. प्रत्येक जण आपापल्या परीने योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे. मदतीचे अजून हात वाढावेत आणि नक्की काय आणि कसं काम चालू आहे हे कळावे यासाठीच हा लेखमाला प्रपंच ….. सगळ्यांनीच आपापला स्वर या राष्ट्रअर्चनेत , या वंदनेत मिळवूया आणि प्रार्थनेचे सामर्थ्य अनुभवूया , वृद्धिंगत करूया.
शब्दांकन : शीतल कापशीकर
सेवावाहिनी : 8390458155