Contact +91 20 27168000
Contact +91 20 27168000

आणि हेल्पलाईन सुरू झाली …..

helpline-started

कोरोना गेला गेला असं वाटत असतानाच मार्च महिन्याच्या शेवटी ध्यानीमनी नसताना दुसरी लाट येऊन धडकली आणि पुन्हा एकदा हाहाकार …. दररोज मन विषण्ण करणाऱ्या बातम्या येत होत्या. ही लाट आधीपेक्षा भयंकर आहे हे जाणवत होतं. अनेक जुने जुने माजी विद्यार्थी सध्या शाळेशी संलग्न असणाऱ्यांना फोन करून उपासनेचा , आरतीचा ऑडिओ आहे का ? थोडी मनःशांतीची गरज आहे असं बोलत होते. पुढे काय ? कसं होणार ?

आपली प्रबोधिनी म्हणून नक्की काय भूमिका ? नुसतं लॉकडाऊन आहे म्हणून हातावर हात घेऊन स्वस्थ बसणं हे जास्तच अस्वस्थ करणारं होतं. २४ एप्रिलला संघटन विभागाची बैठक झाली , त्यात याबद्दल विचारमंथन झाले. ही राष्ट्रीय आपत्ती आहे आणि आपण काहीच न करून कसे चालेल असे अनेकांनी मांडले. पण अजूनही दिशा स्पष्ट होत नव्हती. तेवढ्यात श्रीरामदादाने युवक विभाग आयोजित रक्तदान शिबिराबद्दल सांगितले.

आणि सूर गवसला. आपणही या कार्यात सहभागी होऊया. उपस्थित सगळे एकमुखाने बोलले. पुढे सौरभदादा म्हणाला की आपल्या स्नातक संघाचा मेडिकल SPG चा एक गट आहे ज्यात आपल्या शाळेचे वैद्यकीय क्षेत्रातील माजी विद्यार्थी काम करत आहेत. ते सगळे मिळून असं ठरवतायंत की आपण कोविड रुग्णांना दूरध्वनीद्वारे मोफत सल्ला देऊया का ? पण हे जमावं कसं ? लगेचच पालक महासंघाने कमी तिथे आम्ही ही भूमिका स्वीकारत लागेल ती मदत करायची तयारी दर्शवली. प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले.

डिजिटल माध्यमाचा वापर करत पोस्टर्स , मेसेज बनले आणि वायरल झालेसुद्धा. तज्ज्ञ डॉक्टरांची मांदियाळी आपल्याकडे होतीच. ऍलोपॅथी , आयुर्वेदिक , फिजिओथेरपी , मानसशास्त्र , आहारतज्ज्ञ , योगशिक्षक या सर्वच क्षेत्रातील डॉक्टरांचा एक छान गट तयार झाला.

लोग जुडते गये । कारवा बनता गया ।

घरी बसून जे काही काम असेल ते करायची जबाबदारी युवती विभागाने घेतली. प्रत्यक्ष येऊन हेल्पडेस्कवर फोन कोण घेणार ? पालक संघातील ज्या महिला क्रीडांगणावर खेळायला येतात त्यांनी हा प्रश्न चुटकीसरशी सोडवला. आणि ३ मे पासून ही हेल्पलाईन सुरू झाली सुद्धा ….

गेल्या तीन दिवसांत दोनशेहून अधिक फोनकॉल्स येऊन गेलेत. २१ रुग्णांना आपल्या डॉक्टरांनी दूरध्वनीद्वारे सल्ला – उपचार सुरू केले आहेत. १५ जणांना प्लाज्मा व रक्त देण्यासाठी युवक काम करता आहेत तर ९ घरी डबा / औषधे पोहोचवली आहेत. आकडेवारी फक्त माहितीसाठी दिली पण या संकटात माझ्या पाठीशी एक संघटना खंबीरपणे उभी आहे हे कळल्यावरच कितीतरी रुग्णांना आधार वाटत आहे. आपली हेल्पलाईन ही उपचारवाहिनी ठरत आहे …. प्रबोधन गीतातील शब्द कृतीतून उमटत आहेत …. हातचे न हात हे कधी सुटायचे । बिकट वाट ही तरी पुढेच जायचे ।

आपल्यालाही या कोविड विरुद्धच्या लढ्यात साथ हवी असेल तर जरूर फोन करा – ८३९०४५८१५५

Leave a Reply