मातृमंदिर विश्वस्त संस्था व ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मदुर्ग या जलदुर्गाची तीनशे चौरस फुटात प्रतिकृती साकारली आहे. ज्ञान प्रबोधिनीच्या नवनगर विद्यालयातील बालभवनच्या जागेत ही प्रतिकृती सर्वांना पाहण्यासाठी खुली आहे. शिवरायांनी बांधलेला हा किल्ला आजही सुस्थितीत आहे शिवरायांच्याच भाषेत सांगायचे तर "पद्मदुर्ग वसवून राजपुरीच्या (जंजिरा) उरावर दुसरी राजपुरी वसवली आहे." हा सगळा इतिहास प्राध्यापक मोहन शेटे यांच्या आवाजात आपल्याला ऐकायला मिळाला.
प्रदर्शन दिनांक १८ तारखेपर्यंत सकाळी दहा ते रात्री नऊ या वेळेत पाहण्यासाठी खुले होते. किल्ल्याची तसेच स्वराज्याच्या आरमाराची माहिती देणारे तक्तेही प्रदर्शन ठिकाणी लावण्यात आले होते. तसेच आपण प्रदर्शन किती लक्षपूर्वक पाहिले, वाचले, ऐकले हे पाहणारी एक छोटीशी प्रश्नमंजुषाही घेतली गेली. एकूणच हे प्रदर्शन पाहणे आपल्या ज्ञानात भर टाकणारे असून तसेच रंजक ही झाले. तरी अनेकांनी आवर्जून या किल्ल्यास भेट दिल्याचे संस्थेचे कार्यवाह श्री यशवंत लिमये व विद्यालयाचे प्रशासक श्री शिवराज पिंपुडे यांनी सांगितले.