सौर अग्रहायण १, १९४२ अर्थात २२ नोव्हेंबर, २०२०, रविवार रोजी निगडी केंद्रात प्रतिज्ञाग्रहणाचा कार्यक्रम झाला. केंद्रातील १८ सदस्यांनी प्रबोधिनीची प्रथम प्रतिज्ञा, ५ सदस्यांनी द्वितीय प्रतिज्ञा आणि २ सदस्यांनी तृतीय प्रतिज्ञा घेतली. प्रबोधिनीचे संचालक आदरणीय गिरीशराव बापट हे सदस्यांना प्रतिज्ञा देण्यासाठी उपस्थित होते.
प्रतिज्ञाग्रहण हा ज्ञान प्रबोधिनीत होणाऱ्या संस्कारांपैकी एक महत्वाचा संस्कार कार्यक्रम आहे. आ. संचालकांनी तयार केलेली प्रबोधिनीच्या प्रथम प्रतिज्ञेपूर्वीची विद्यार्थ्यांसाठीची प्रतिज्ञा दरवर्षी निगडी केंद्रातील इ. ९वी चे इच्छुक विद्यार्थी घेत असतात. यंदा कोविड वैश्विक प्रश्नामुळे शाळा देखील दूरस्थ पद्धतीने चालू आहेत. परंतु केंद्रातील प्रौढ सदस्य आणि अध्यापक तेवढ्याच ऊर्जेने काम करत आहेत आणि त्याचीच एक पुढची पायरी म्हणून सदस्यांनी त्यांची प्रतिज्ञा घेण्याची इच्छा व्यक्त करणारी पत्रे आ. संचालकांना दिली होती. या वर्षी प्रथमच २५ च्या संख्येने निगडी केंद्रात प्रौढ कार्यकर्त्यांचे प्रतिज्ञाग्रहण झाले.
‘शुभ्र सुगंधित पुष्पे आणिक शुभ्र सुगंधित मने, मातृभूमी तव चरणी याहून अन्य काय अर्पिणे?’ या प्रबोधिनीच्या पद्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ज्ञान प्रबोधिनी निगडीचे केंद्रप्रमुख मा. मनोजराव देवळेकर यांनी प्रस्तावनेमध्ये ‘मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्या वर्धापन दिनी’ प्रतिज्ञाग्रहण करण्याची पार्श्वभूमी सांगून आ. संचालक आणि आ. कार्यवाह सुभाषराव देशपांडे यांचं स्वागत केलं. पूर्व-प्रतिज्ञीतांच्या मनोगतांमध्ये प्रथम प्रतिज्ञीत सदस्या स्वातीताई गायकवाड आणि द्वितीय प्रतिज्ञीत सदस्य श्रीरामदादा इनामदार यांनी आपला प्रतिज्ञेमागचा विचार आणि अनुभव मांडला. प्रथम प्रतिज्ञा ग्रहणापूर्वी ‘प्रबोधकांचे पंचायतन’ या उताऱ्याचे वाचन गार्गी साळवेकर हिने केले तर ‘भजनास लावावे बहुत लोक’ या उताऱ्याचे वाचन ऋचा मापारी हिने द्वितीय प्रतिज्ञा ग्रहणापूर्वी केले. तृतीय प्रतिज्ञेपूर्वी शिवराजदादा पिंपुडे यांनी ‘पेटली ज्योत विझणार नाही’ हे काव्यवाचन केले. सर्व प्रतिज्ञार्थींना आदरणीय संचालकांनी प्रतिज्ञा दिल्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात तृतीय प्रतिज्ञीत सदस्य आदित्यदादा शिंदे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
आ. संचालकांनी प्रतिज्ञीत सदस्य आणि उपस्थितांना मार्गदर्शन करताना ज्ञान प्रबोधिनीच्या प्रार्थनेचा कार्यकर्त्यांसाठीचा अर्थ उलगडला. ‘जो जशी श्रद्धा ठेवतो, तसा तो होतो’ हे लक्षात घेत आपली शक्ती आणि प्रेरणा वाढण्यासाठी प्रार्थना आणि प्रतिज्ञा आहेत म्हणून ते करूया. सध्याच्या काळातील प्रश्नांना उत्तर देताना विनोबा भावेंनी म्हटल्याप्रमाणे ध्येय मिळवून देणारी शिक्षणपद्धती आपल्याला नव्याने मांडता येईल आणि प्रयत्नवादी संघटनेचं काम करता येईल. प्रबोधिनीचे काम अनेक ठिकाणहून देशभर वाढवत नेता यावं यासाठी त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. संपूर्ण उपासनेने कार्यक्रमाची सांगता झाली. केंद्रातील अध्यापक, युवक-युवती आणि ज्येष्ठ सदस्य मिळून एकूण ५५-६० कार्यकर्ते कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष उपस्थित होते. अप्रत्यक्ष माध्यमातून कार्यक्रम ज्ञान प्रबोधिनी निगडीच्या youtube वरती अन्य सदस्यांसाठी दाखवण्यात आला. युवती विभागाने एकूण कार्यक्रमाची जबाबदारी घेतली होती.
यावर्षी प्रतिज्ञा घेतलेल्या सदस्य पुढील प्रमाणे
प्रथम प्रतिज्ञा
१. मधुरा देव – अर्थ कार्यालय
२. श्रद्धा कुलकर्णी – पूर्व प्राथमिक
३. शरयू निकम – माध्यमिक मराठी
४. प्राची क्षीरसागर – पालक
५. सरिता पत्तेवार – गुरुकुल
६. लता भोर – गुरुकुल
७. सुनीता वामन – माध्यमिक इंग्रजी
८. मंजुषा रानडे – प्राथमिक इंग्रजी
९. स्वाती गवळीकर – प्राथमिक इंग्रजी
१०. सुषमा कोंढरे – प्राथमिक इंग्रजी
११. हर्षदा माळी – पालक
१२. माधवी पोतदार – पालक
१३. गायत्री शहा – गुरुकुल
१४. सारीका बारपांडे – गुरुकुल विभाग
१५. मनोज नांदे – प्राथमिक मराठीक
१६. सुमेध जोशी – युवक
१७. नचिकेत भाटे – युवक
१८. पंकज चापोलीकर – पालक
द्वितीय प्रतिज्ञा
१. अश्विनीताई इनामदार – गुरुकुल
२. वृंदा गाडगीळ – पूर्व प्राथमिक विभाग
३. मीनाताई दीक्षित – प्राथमिक मराठी
४. स्मिता घोलप -माने – माध्यमिक मराठी
५. स्मिता आगळे – प्राथमिक मराठी
तृतीय प्रतिज्ञा
१. संगीता कुलकर्णी
२. आदित्य शिंदे