परवा म्हणजे रविवारी आपल्या मातृमंदिरात जी अँटीजेन टेस्ट झाली त्यात माई बालभवन संस्थेतील तब्बल ७ मुली पॉझिटिव्ह आल्या होत्या. लगेचच त्या सगळ्यांना SPM शाळेतील RSS संचालित कोविड सेंटरमध्ये दाखल केले. पण आता पुढे काय ? त्या संस्थेतील इतरांची चाचणी करणे आवश्यक होते. याबाबत प्रमोद सर आणि आनंदवन संस्थेचे कार्यकर्ते श्री. भास्कर गोखले यांच्याशी बोलणे झाले. त्यांनी लगेचच पिंपरी चिंचवड मनपाचे डॉ. कुराडे यांना संपर्क करून याबाबत कल्पना दिली. डॉक्टरांनी देखील ताबडतोब होकार दिला. सोमवारी दोन तीन ठिकाणी अँटीजेन टेस्ट शिबिर तसेच खूप पाऊस देखील असल्याने मंगळवारी सकाळीच जाऊया असे ठरले. सकाळी १०.३० वाजताच डॉ अर्चना , टेक्निशियन राम राठोड , सिस्टर प्राजक्ता आखाडे, कल्पना कांबळे , डेटा ऑपरेटर रोशन , वंदना वाघमारे मावशी व वाहन चालक युवराज मोळीक यांच्या टीमबरोबर आम्ही मार्गस्थ झालो.
आधी या संस्थेतील काही जण विकासनगर – देहूरोड या ठिकाणी राहतात तिथे गेलो. काही अंध , काही गतिमंद तर काही अपंग अशा सगळ्यांची अँटीजेन टेस्ट केली. आणि अतिशय आनंदाची बाब म्हणजे सगळ्यांची टेस्ट निगेटिव्ह. इतक्यात जवळच्या घरातील एकजण इथे बहुतेक टेस्ट चालू आहे तर करून घेऊया या उद्देशाने आले. हे गृहस्थ पोलीस खात्यातून निवृत्त झाले होते. त्यांची टेस्ट केली असता दुर्दैवाने ती पॉझिटिव्ह आली. त्यांना विशेष काही त्रास होत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना घरातच विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला आणि आम्ही त्यांना आपला सेवावाहिनी संपर्क क्रमांक दिला. आणि तिथून आम्ही या संस्थेच्या दुसऱ्या शाखेत जिथल्या मुली सध्या पॉझिटिव्ह आहेत तिथे गेलो. तिथेही काही पूर्णतः तर काही अंशतः अंध – अपंग. पण गेल्या गेल्या त्यांनी रविवारी विलगीकरणात ठेवलेल्या मुलींबद्दल विचारलं … आपण त्यांची इतकी छान सोय केली याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आपण या लोकांसाठी काहीतरी करतोय हे बघून PCMC च्या सगळ्या टीमला खूप समाधान वाटत होते.पुढे सगळ्यांची टेस्ट झाली तर चार मुली पॉझिटिव्ह. एकदम धस्स झालं. डॉक्टरांना विनंती केली की इतरांची RT – PCR टेस्ट कराल का ? कारण अँटीजेन निगेटिव्ह आली तरी RT – PCR केल्यावर अनेक जण पॉझिटिव्ह येतात हे माहीत होतं. डॉक्टरांनी सगळ्यांच्या टेस्ट्स करून आमचा निरोप घेतला. आम्ही त्यांचे आभार मानताच तुम्ही आम्हाला मदत करत आहात , प्रबोधिनीमुळे रविवारी ८२ तर आज जवळपास २७ जणांच्या चाचण्या करता आल्या. असे म्हणाले.
आता आम्हाला पुढचे काम करायचे होते. या मुलींना SPM मध्ये न्यायचे होते. प्रमोद सरांनी शेजारच्याच प्रज्ञानबोधिनीत जाऊन जोशी सरांकडून दुचाकी मिळवली आणि ते वाहन शोधू लागले. एका रिक्षाची सोय झाल्यावर आम्ही मुलींना धनश्री हॉस्पिटलला नेऊन सगळ्यांचे X-Ray काढले व नंतर त्यांना SPM शाळेत नेले. तिथे आपल्याच श्रेया कुलकर्णी आणि ऋतुजा क्षीरसागर या माजी विद्यार्थिनी भेटल्या. त्या तिथे पूर्ण वेळ स्वयंसेवक म्हणून काम करत होत्या. त्या दोघींना तिथे बघून टेन्शन अजूनच कमी झाले. आपल्या शाळेतील चिंबळीच्या मुली पण तिथेच विलगीकरणात आहेत … त्यांची भेट देखील सोशल डिस्टनसिंगचे सर्व नियम पाळत घेतली. त्या मुलींना पण खूपच बरं वाटलं. आपला माजी विद्यार्थी प्रसाद फाटक हा देखील संघाचा कार्यकर्ता … मी आणि प्रमोद सर बराच वेळ पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आहोत हे बघून त्याने आम्हाला आवश्यक त्या सर्व सूचना दिल्या. त्या सगळ्यांचा निरोप घेऊन आम्ही तिथून निघालो.
आपण रविवारी शिबिर आयोजित केले त्यामुळे या संस्थेतील सगळ्यांची म्हणजे ३३ जणांची आपण चाचणी केली आणि आजमितीला ११ पॉझिटिव्ह म्हणजे जवळपास ३३% …. Testing – Tracing – Tracking ह्या त्रिसूत्रीचे पालन करून आपण कोरोनाची एक छोटीशी का होईना साखळी तोडत आहोत हे समाधान मनात आहे. PCMC टीम , आनंदवनचे कार्यकर्ते श्री. भास्कर गोखले , विवेकानंद केंद्राचे कार्यकर्ते , SPM शाळेतील RSS चे सर्व स्वयंसेवक या सर्वांच्या मदतीने हे शक्य झाले. या सर्वांचे मनःपूर्वक आभार ….
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
शीतल कापशीकर
सेवावाहिनी : 8390458155