आपली सेवावहिनी सुरू झाल्यापासून अनेक जणांचे फोन येताहेत. त्यातलाच एक फोन …. माझ्या वडिलांना प्लाज्मा हवाय. त्यांनी पुढे रुग्णाचे – रुग्णालयाचे नाव , ब्लड ग्रुप , कोविड पॉझिटिव्ह आहे हे कळल्याची तारीख इत्यादी सर्व तपशील सांगितला. तो सर्व नोंदवून त्यांना कळवतो असे उत्तर दिले. लगेचच प्लाज्माचे काम करणाऱ्या युवकांकडे ही माहिती पोहोचवली गेली.
आपल्याकडे निगडी केंद्रातील सदस्यांकडून (पालक – शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी , युवक युवती , माजी विद्यार्थी आदी सर्वच) गूगल फॉर्मद्वारे भरलेली माहिती होतीच. योग्य दात्याला संपर्क केला. त्यांची देखील प्लाज्मा देण्याची तळमळ जाणवली. फक्त त्यांना तो कसा , कुठे द्यायचा ? दिल्यावर त्यांना काही त्रास होईल का ? किती दिवसानी आणि किती वेळा देता येईल ? हे आणि असे अनेक प्रश्न सतावत होते. आजकाल अनेक जण स्वतः पॉझिटिव्ह आल्यावरच ठरवतात की मी प्लाज्मादान नक्की करेन. कारण अनेक अत्यवस्थ रुग्णांना प्लाज्मा थेरपीची आवश्यकता भासते. आणि तो मिळाल्यावर ते कोरोनामुक्त होतात. जे जीवनदान परमेश्वरानं माझ्या पदरात टाकलं त्याचा उपयोग दुसरा जीव वाचवण्यासाठी नक्की करेन.
असा विचार करून प्लाज्मा देणारे त्या रुग्णासाठी अक्षरशः देवदूत बनून येतात. त्यांच्या सर्व शंकांचे डॉक्टरांकरवी निरसन केल्यानंतर संबंधित ठिकाणी दाता (Donor) उपलब्ध आहे असे कळवले आणि त्या रुग्णाचे प्राण वाचले. देणारा आणि घेणारा यांचे ऋणानुबंध नक्कीच असणार … फक्त देणाऱ्याला कुणाला द्यायचे आणि घेणाऱ्याला मला कुणाकडून मिळेल हे माहीत नसते. आपली सेवावाहिनी फक्त तो साधणारा दुवा बनली होती. या दोघांच्या प्रतिक्रिया त्यांच्याच शब्दांत …..
प्रबोधिनी मुळे प्लाज्मा देण्याची संधी मिळतीये आणि त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे. तुम्ही धन्यवाद म्हणण्यापेक्षा आम्ही म्हणायला पाहिजे. तुमच्यामुळे प्लाज्मादान बद्दल नीट माहिती मिळाली आहे. Post covid therapy खूपच चांगली कल्पना आहे.
– प्लाज्मा दान करणाऱ्या पालक
We are so much fortunate for your prompt support in this situation. And I’ll definitely spread your helpline form as much as possible, so that most of the people get benefited.
– प्लाज्माची गरज असलेल्या रुग्णाचा मुलगा
शब्दांकन : शीतल कापशीकर
सेवावाहिनी : 8390458155