कथा एका मातेच्या व्यथेची …..
हेल्पलाईनवर सेवा सुरू झाल्याचा आजचा दुसरा दिवस …. फोन येणे सुरू झाले होते. लोक व्यक्त होत होते. आवश्यक त्या मदत – सेवेसाठी त्यांना जोडून दिले जात होते. ४ तारखेला सकाळी साधारण नऊ साडे नऊची वेळ … फोन खणखणला … समोरून एक अस्वस्थ , प्रचंड घाबरलेला आवाज …
हॅलो ताई , ऐका ना , मी अबक , मला मदत करा प्लीज … कराल ना ? काय उत्तर द्यायचं बरं अशा वेळी ? तरी त्यांना आश्वासक स्वरात धीर दिला… त्या बोलू लागल्या … माझं बाळ …. दीड वर्षाच्या मुलीला सतत ताप आहे आणि तो उतरत नाहीये … ९९-१०० च्या रेंजमध्ये आहे . (आत्ता लक्षात आलं इतका अस्वस्थ स्वर एका माऊलीचा होता जिला आत्ता तिचं बाळ सोडून काहीही दिसत नव्हतं) त्यांची ही माहिती आपल्या डॉक्टर टीमकडे पोहोचली.
त्यात ज्या बालरोगतज्ज्ञ आहेत त्यांनी यावर काम सुरू केले आणि त्या मातेला फोन केला. सर्व परिस्थिती नीट समजून घेतली , सगळी लक्षणं विचारली, व्यवस्थित तपासली असता त्यांच्या लक्षात आले की बाळाच्या हिरड्यांना सूज आल्यामुळे ताप येत होता. दात येताना असा त्रास होणे खरं तर अगदी स्वाभाविक आहे पण सध्याची परिस्थिती बघता … मन चिंती ते वैरी न चिंती … केवळ भीतीचे सावट …. डॉक्टरांनी त्या आईला अगदी व्यवस्थित समजवून सांगितले … आता ती बरीच शांत झाली होती. कोरोनाचे कुठलेही लक्षण त्या बाळात नव्हते. आणि दात येण्याची सगळी लक्षणे तोंडपाठ असूनही ही माऊली निव्वळ भीतीने गारठली होती. आपल्या हेल्पलाईनने तिला खूप धीर मिळाला होता.
तिची विचारशक्ती जागृत झाली होती. तिच्या बाळाला वैद्यकीय आणि तिला स्वतःला मानसिक उपचार एकाच वेळी मिळाले होते. हेल्पलाईन सुरू केल्याचे एक आगळे समाधान सर्व कार्यकर्त्यांमध्ये दिसत होते.
शब्दांकन : शीतल कापशीकर
हेल्पलाईन :
8390458155