कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर आणि १मे नंतरच्या वाढत्या लसीकरणामुळे बऱ्याच रक्तदात्यांना इच्छा असून देखील रक्तदान करता येणार नव्हते. त्यामुळे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून युवक विभागाने शंकर महाराज सेवा ट्रस्ट, चिंचवड यांच्या सोबत १ मे २०२१ रोजी मातृमंदिरात रक्तदान शिबीर आयोजित केले होते. या उपक्रमाची जबाबदारी हिमांशू गपचूप आणि अनुज देशपांडे या युवकांकडे होती. या व्यतिरिक्त १८ युवक दिवसभर इतर व्यवस्थांत सहभागी होते. सध्याची महामारी लक्षात घेता कमीतकमी गर्दी करून जास्तीत जास्त रक्तदात्यांकडून पिशव्या रक्त गोळा करण्याचं आव्हान सगळ्यांसमोर होतं. त्यासाठी गूगल फॉर्म तयार केला आणि त्यात सोयीच्या वेळा निवडण्याची मुभा रक्तदात्यांना देण्यात आली.
डॉ. वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, डी. वाय. पाटील आणि यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल या तीन रक्तपेढ्या बोलवण्यात आल्या. मंदार जोशी आणि तुषार देशपांडे या युवकांकडे पार्किंग व्यवस्था आणि येणाऱ्या लोकांना रजिस्ट्रेशन बद्दल विचारण्याची जबाबदारी होती. तिथून टोकन घेऊन रक्तदात्यांना मातृमंदिरच्या समोर केलेल्या बैठक व्यवस्थेप्रमाणे बसायचं होतं. तिथे सामाजिक अंतर राखून २५-३० लोकांची बैठक व्यवस्था होती. त्या पुढच्या लोकांची बैठक व्यवस्था आतल्या बाजूला वर्गांत केली होती. अमेय देशपांडे आणि आदित्य काळभोर या युवकांकडे टोकन प्रमाणे नंबर पुकारून रक्तदात्यास मातृमंदिरात बोलवायची जबाबदारी होती. या व्यतिरिक्त परिसरात गर्दी होत नाहीये ना आणि झाल्यास त्यावर नियंत्रण या साठी अवधूत गुरव हा युवक होता. तिथे आल्यावर स्वानंद पटवर्धन हा युवक रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन किंवा आयत्या वेळेस आलेल्यांची माहिती भरून घेत होता. यानंतर रक्तदात्यास संबंधित रक्तपेढीकडे पाठवून रक्तदान सुरू होत होते. रक्तदान झालेल्यांच्या अल्पोपहाराची जबाबदारी दिनेश झरकर आणि सोहम मानकर या युवकांकडे होती. यानंतर तन्मय साळुंखे हा युवक रक्तदान झालेल्या लोकांची यादी भरत होता आणि त्यांना रक्तदानाचा बिल्ला, बुकमार्क देत होता. तसेच रस्तदात्यांसाठी खास सेल्फी पॉइंट सुध्दा ठेवला होता. या व्यतिरिक्त अथर्व देशपांडे आणि वेदांत कुलकर्णी हे युवक डॉ. वैद्यांचे मदतनीस म्हणून काम करत होते. रक्तपेढी आणि शंकर महाराज सेवा ट्रस्टच्या सदस्यांच्या भोजनाची जबाबदारी अभिषेक लिमये आणि सुमेध जोशी या युवकांकडे होती. रक्तदात्यांना ऑनलाईन कृतज्ञता पत्र कल्पेश कोठाळे आणि वेदांत कट्टी या युवकांनी पाठवली.
रक्तदानाच्या कार्यक्रमाची सुरवात उपासनेने झाली. अभिलाष देशपांडे या युवकाने उपासना घेतली. त्यानंतर आदित्य दादाने प्रस्तावना केली. मा. भाऊंचा जन्मदिवस असल्याने त्यांच्या शिकवणी संदर्भात देवळेकर सर सर्वांशी बोलले. स. ९:३०- सायं. ४:३० या वेळेत रक्तदान झाले. या दरम्यान रजिस्ट्रेशन केलेल्या ४०१ पैकी ३१५ दात्यांनी उपस्थिती नोंदवली. त्यापैकी २६८ जणांना रक्तदान करता आले. तसेच आयत्या वेळेस आलेल्या १११ पैकी ६६ जणांना रक्तदान करता आले. अशा प्रकारे एकूण ३३४ जणांनी रक्तदान केले. युवक विभाग आणि निगडी केंद्रासाठी ही अभिमानाची गोष्ट होती. रक्तपेढी प्रमाणे वर्गीकरण
पुढीलप्रमाणे :
डी. वाय. पाटील – १३५ पिशव्या
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल – १०८ पिशव्या
यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल – ९१ पिशव्या
या उपक्रमात सर्वच युवकांनी जोरदार पब्लिसिटी केली. मराठी- हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेकांपर्यंत शिबिराबद्दल माहिती पोहचवली आणि त्यांच्या मार्फत सोशल मीडियावर अनेकांपर्यंत हा उपक्रम पोहचण्यास मदत झाली.
या उपक्रमामार्फत युवक विभाग किमान ६००-६५० लोकांपर्यंत पोहोचू शकला याचा आनंद आहे. उपक्रमासाठी ₹२४,५००/- इतका खर्च आला.