प्रसंग पहिला…
“हॅलो , मी अमुक तमुक” ….. यानंतर मोठ्ठा पॉज … “कसं सांगू कळत नाहीये … आमच्या घरी सगळे पॉझिटिव्ह आलेत “… पुन्हा एक मोठा पॉज. आपली फोन घेणारी ताई विचित्र मनस्थितीत की या बाई बोलताना असं का थांबत आहेत ? अडखळत का बोलत आहेत. जे पॉझिटिव्ह आहेत त्यांच्या मदतीसाठीच ही आपली सेवावाहिनी आहे की. अखेर त्यांनी मौन सोडलं आणि घाबरलेल्या आवाजात म्हणाल्या… ” माझा पण कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय आणि मी गरोदर आहे … नववा महिना चालू आहे , माझी ट्रीटमेंट माझ्या माहेरच्या गावात सुरू आहे आणि आत्ता मी इथे PCMC मध्ये आहे. काय करता येईल ? आणि हो …. माझा फोन आला होता हे कुठे बोलू नका प्लीज.” आपल्या सेवावाहिनीवर दाखवलेला विश्वास बघून एकीकडे खूप छान वाटलं पण त्याच वेळी त्या ताईंची परिस्थिती , भावना बघून वाईट वाटलं. आपल्याकडे कमालीची गुप्तता पाळली जाते हे आश्वासन त्यांना दिल्यावर त्या थोड्या रिलॅक्स झाल्या. डॉ. अस्मिता यांनी त्यांना सुरुवातीला आयुर्वेदिक औषधे सुचवली पण त्या ताईंनी हळूच तुमच्याकडे कुणी स्त्रीरोगतज्ञ आहेत का असे विचारले. नंतर हा कॉल डॉ. प्रतिमा यांच्याकडे गेला. आता त्या ताई खूप शांत झाल्या होत्या. त्यांची ट्रीटमेंट सुरू झाली होती. मनाला धीर मिळाला होता. आपली सेवावाहिनी एका भावी मातेसाठी वरदान ठरत होती. आता आपल्याकडे तिला केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक उपचार देखील मिळत आहेत.
प्रसंग दुसरा…
एक गृहस्थ बोलत होते. अत्यंत थकलेला आणि काळजीयुक्त आवाज … “ताई मला मदत हवीय … मी आत्ताच मेहुणीचे क्रियाकर्म करून आलोय. करताना भीती वाटली नाही. आणि हो मी पूर्ण दक्षता घेतली होती बरं का” …. मग आता काय असावे बरं असा विचार आपली ताई करत राहिली. ते पुढे म्हणाले “माझ्या घरी बायको , दोन लहान मुलं … त्यातलाही एक विशेष … म्हणजे अधिकच काळजी … मला काही झालं तर ?” आता त्यांचा स्वर गदगदलेला वाटत होता. स्वतःपेक्षा त्यांच्यावर असलेली जबाबदारी हे बोलत होती. रोजच्या कानावर पडणाऱ्या बातम्या , मीडियावर दाखवल्या जाणाऱ्या अतिरंजित कहाण्या , डोळ्यासमोर तरळत असलेली अनाथ कुटुंबं … सगळं सगळं त्यांना अस्वस्थ करत होतं. ताईने त्यांना धीर दिला पण तेवढ्याने त्यांचे समाधान झाले असे वाटले नाही. हा कॉल डॉ. बागेश्रीने हाताळला. त्यांना काही त्रास होतोय का ? नक्की काय काय दक्षता घेतली हे विचारलं. सगळी उत्तरं मिळाल्यावर अगदी आश्वासक स्वरात सांगितलं “बिलकुल काळजी करू नका , योग्य ती काळजी – दक्षता तुम्ही घेतली आहेच पण सावधानता म्हणून दोन दिवस विलगीकरणात राहा आणि काहीही लक्षणं आढळली तर लगेच संपर्क करा.” डॉक्टरांनी स्वतः दिलेल्या या आश्वासनामुळे ते बरेच निर्धास्त झाले.
बरेचदा असंच होतं की कोरोना नाही पण भीती मारक ठरते. साप साप म्हणून दोरीच बडवली जाते. अशा वेळी आवश्यकता असते ती योग्य मार्गदर्शकाची. आपल्या सेवावाहिनीच्या माध्यमातून हेच मार्गदर्शन मिळतेय याचं खरोखरच समाधान वाटतंय.
शब्दांकन : शीतल कापशीकर
सेवावाहिनी : 8390458155