एखाद्या घरात कोरोना शिरकाव करतो. कधी एखाददुसरा तर कधी सबंध घरच ताब्यात घेतो. पुढे चाचणी – उपचार ओघाने आलेच. पुढे ते सगळे मस्त बरे होतात. क्वचित प्रसंगी वाईट घटनेला सामोरं जावं लागतं … या आजारात बरे होण्याची टक्केवारी … (Recovery rate) प्रचंड आहे. तरीही कधी वयोमानामुळे , आधीच्या वैद्यकीय इतिहासमुळे (medical history) , कधी उपचाराला उशीर झाल्यामुळे किंवा काही अन्य कारणामुळे जीव गमवावा लागतो. पेशंट बरा झाल्यावर किंवा दुःखद घटना घडल्यावर … काहीही झाल्यावर सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे पूर्ण घर किंवा आपला परिसर सॅनिटाईझ करून घेणे. आपल्या ज्ञान प्रबोधिनी केंद्राकडून ही सुविधा देखील आपण पुरवतो. आपल्या केंद्रातील अध्यापक श्री. शैलेश डुंबरे ही जबाबदारी पेलतात.
आपल्या महानगरपालिकेकडूनही हे सॅनिटायझेशन होतं पण तरीही त्यांच्यावर खूपच बोजा असल्याने आपण ही सेवा पुरविण्याचे ठरवले. डुंबरे सरांनी पूर्ण अभ्यास केला , थोडेसे प्रशिक्षण घेतले आणि PPE किट घालून , PPE किट घातलेला मदतनीस घेऊन ही सेवा सुरू केली फक्त हे जरा खर्चिक असल्याने आपण सशुल्क पण अत्यल्प दरात ही सेवा पुरवतो. जे घर किंवा जो परिसर सॅनिटाईझ करायचा असतो त्याच्या आकारावरून हा दर निश्चित करण्यात येतो. त्या घरात सगळीकडे … फरशीवर , भिंतीवर , वॉशरूममध्ये , बाल्कनी – टेरेस – अंगण असेल तर तिथे सगळीकडे हायपोक्लोराईडची फवारणी केली जाते. सर्व दारे – खिडक्या – कड्या – कोयंडे देखील या ऍसिडने स्वच्छ करून दिली जातात. नंतर सगळं घर पुसून दिलं जातं. अशा प्रकारे संपूर्ण निर्जंतुकीकरण केलं जातं. अर्धा तास घरातील सर्वजण बाहेर थांबून नंतर घरात प्रवेश करू शकतात. अशी ही सगळी प्रक्रिया राबवली जाते.
या सुविधेसाठी आपल्या सेवावाहिनीवर आजपर्यंत ९ कॉल आलेत तर ३ ठिकाणी प्रत्यक्ष सॅनिटायझेशन झाले आहे.
एक कॉल तर अगदी गंमतशीर …. “हॅलो , मला घर स्वच्छ करून हवंय (स्वच्छ म्हणजे सॅनिटाईझ हे आपण मनातल्या मनात ओळखायचं 😄😄) … कधी पाठवता माणूस?”
आपल्या ताईने डुंबरे सरांना याबाबत सांगितले. सरांनी त्या बाईंना फोन करून माहिती विचारायला सुरुवात केली. कधी – कोण पॉझिटिव्ह होते घरात ? … त्या बाई म्हणाल्या मागच्या महिन्यात माझा मुलगा पॉझिटिव्ह होता …. मागच्या महिन्यात , मग आता सॅनिटायझेशनचा काय उपयोग ? आता काय करावे , हे डुंबरे सरांना सुचेना. तरीही त्यांना हवेच आहे म्हटल्यावर सरांनी किती खर्च येईल ते सांगितले. तर त्या बाई म्हणाल्या … फुकट नाहीये का हे? मला वाटलं ज्ञान प्रबोधिनी करतीये म्हणजे फुकट असणार. म्हणून मी करणार होते. पैसे बिसे घेणार असाल तर राहू दे. आता काय बोलणार यावर ? समाजाची ही मानसिकता … गरज नसेल तरी निव्वळ फुकट आहे म्हणून घ्यावे ही बदलायला हवी हा विचार मनात चमकून गेला.
दुसरा प्रसंग … मन हेलावणारा … एका घरात सॅनिटायझेशन करायला गेले. खर्च सांगितलेला होताच. ते तयार पण होते. त्या बाई बाहेर आल्या. कोण पॉझिटिव्ह होतं हे विचारल्यावर त्यांनी ५-६ दिवसांपूर्वी त्यांचे जावई गेले असल्याचं सांगितलं. त्यांनी मुलीला बाहेर बोलावलं तर ती तीन महिन्याच्या बाळाला घेऊन बाहेर आली. बापरे ! इतक्या लहान लेकराचं पितृछत्र हरवलं होतं. डुंबरे सरांचे डोळे पाणावले. कर्तव्यबुद्धीने काम पार पाडलं. ते त्या बाईंना म्हणाले … या कामाचे पैसे नकोत … एक छोटीशी मदत समजा. यावर त्या बाई म्हणाल्या … तुम्ही इतका वेळ खर्च केलाय , साहित्य वापरलं त्यालाही मोल आहेच की. फक्त आम्हाला घर अजून एकदा पुसून द्या … लहान बाळ आहे ना आमच्याकडे. खरं तर ते घर एकदाच पुसून देतात कारण त्या फवाऱ्याचे अस्तित्व घर निर्जंतुकीकरणाला मदत करते पण इथे गोष्ट वेगळी होती. त्या वासाचा बाळाला त्रास नको व्हायला म्हणून संपूर्ण घर पुन्हा एकदा पाण्याने पुसून दिले.
ही सर्व सेवा सशुल्क जरी असली तरी त्यामुळे त्या बाईंना एक आगळे समाधान मिळाले होते. त्यांचा जावई आता परत येणार नव्हता पण ते कोरोना विषाणू आता या घरात नाहीत , बाकी सगळे सुरक्षित आहेत या विचाराने त्या निर्धास्त होऊ शकत होत्या… झालं गेलं गंगेला मिळालं असं म्हणून आयुष्याची पुढची वाट चालू शकत होत्या…. आपल्या सेवावाहिनीने त्यांना दुःखात सुद्धा आता घरातील इतरांना बरचसं सुरक्षित करून मानसिक बळ दिलं होतं.
शब्दांकन : शीतल कापशीकर
सेवावाहिनी : 8390458155