ज्ञान प्रबोधिनी पुणे आणि निगडी केंद्राने एकत्रित येऊन माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ ... एकत्र वाटचालीची सुरुवात. मनोहर सभागृहात नांदीचे सूर दुमदुमले आणि वातावरणातली सकारात्मकता अजूनच वाढली. त्या दिवशी सकाळपासूनच पुणे आणि निगडी केंद्राचे माजी विद्यार्थी यांची लगबग सुरू होती. त्याचवेळी सालाबादप्रमाणे गीताजयंतीच्या (त्या आठवड्यातील रविवार) निमित्ताने सकाळी सात वाजल्यापासून मातृमंदिरात संपूर्ण गीता पठण सुरू होते. नावनोंदणी - न्याहारी झाल्यावर नियोजित वेळेपूर्वीच सर्वजण मनोहर सभागृहात दाखल झाले. आदित्यदादाच्या निवेदनानंतर पडदा उघडला आणि सगळे जण संगीत नाटकाच्या काळात हरवून गेले. सूत्रधार चारुदत्तबुवा आफळे यांनी २००० संगीत नाटकांचा १४० वर्षांचा काळ आपल्या खुसखुशीत शैलीत उलगडला. शाकुंतल , सौभद्र , कालिदास , स्वरसम्राज्ञी , मंदारमाला , मत्स्यगंधा , मूकनायक आदी नाटकांतील वेगवेगळ्या रागात व तालात रचलेल्या नांदी रंगमंचावर सादर करण्यात आल्या. संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना तसेच संगीत संयोजन राजीवजी परांजपे यांनी तर दिग्दर्शन अमित वझे यांनी केले. राजीवजी परांजपे (ऑर्गन) , मिलिंद लिंगायत (ढोलकी व पखवाज) , रोहन चिंचोरे (तबला) यांनी वाद्यसंगत केली. कविता मेहेंदळे , पूजा रानडे , प्रज्ञेश नेर्लेकर , नचिकेत देव , विशारद गुरव , स्वरेशा पोरे , स्नेहल कोकीळ यांनी या सर्व नांदी गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर झालेल्या सभेत सुरुवातीला प्रस्तावना करताना पुण्याचे माजी विद्यार्थी आणि निगडीचे केंद्रप्रमुख मनोज देवळेकर यांनी निगडी केंद्राचा भौतिक विस्तार कसा झाला हा इतिहास उलगडत कै. वामनरावांच्या कल्पनेतील केंद्राचा सुवर्णमहोत्सव कसा असावा हेही सांगितले. माजी विद्यार्थी संघटन का - कसे करावे , त्यातील पुढचे टप्पे काय असावेत याबद्दल अनेकांचे Friend - Philosopher - Guide असणारे विवेकराव कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.
त्यांनी समाजातील विविध आव्हानांना तोंड देण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी प्रबोधिनी म्हणून एकत्र येऊन काम केले तर खूप मोठे काम उभे राहू शकते हे सोदाहरण सांगितले. पुढे अजय फाटक यांनी पुण्यातील विशेष उद्दिष्ट गटांची .. SPGs ची स्थापना आणि वाटचाल याबाबत भाष्य केले. नंतर Connect या नियतकालिकाचे प्रकाशन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर अतुलचंद्र कुलकर्णी यांनी काम कसं पुढे न्यावं याबाबत विचार मांडले. विविध अनुभव सांगितले. आपलं काम , समाजातील स्थान विसरून एकत्र येऊन काम करायला हवे असे ते म्हणाले. नंतर निगडी केंद्राच्या माजी विद्यार्थिनी ऍड. प्रतिभा जोशी दलाल यांनी प्रबोध रत्न पुरस्कार ते स्नातक संघ हा प्रवास उलगडला. कोविड काळातले या संघाचे उपक्रम , मेडिकल SPG चे यांचे काय काम चालू आहे ते सांगितले. मा. संचालक गिरीशराव बापट यांनी नवनगर विद्यालयातून बाहेर पडणारे सगळे भगीरथासारखे प्रयत्नवादी , दृढ संकल्प करणारे व्हावेत ही कै. भाऊंची इच्छा - अपेक्षा होती. विद्याव्रतींची संघटना ही समाजाचे रूप पालटायला उपयोगी ठरू शकते आणि अशी संघटना तयार करणे हे प्रबोधिनीचे उद्दिष्ट आहे हे कै. आप्पांनी लिहून ठेवले आहे. अशा शिक्षण पध्दतीचा पाया जिथे घातला जातो तिथले आपण माजी विद्यार्थी आहोत. आपल्याला राष्ट्रघडणीचे पीठ बनायचे आहे असे म्हणत त्यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. हराळी केंद्राचे प्रमुख व पुणे प्रशालेचे माजी विद्यार्थी अभिजीत कापरे यांनी पुढच्या वर्षीचा मेळावा हराळी येथे घेऊया हा मनोदय व्यक्त केला. पुणे माजी विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षा चेतनाताई गोसावी यांनी काम करणाऱ्या सर्वांचे कौतुक करत या साखळी जोडूया असे म्हणत हे संघटन वाढविण्याचे आवाहन केले. सर्व कार्यकर्त्यांचे - उपस्थितांचे आभार मानले.
सभेनंतर सर्वजण संघटन व IT , उद्योजकता , शिक्षण , वैद्यकीय , क्रीडा , आर्थिक , राजकीय व सामाजिक , कला या विविध आठ गटात गटचर्चेसाठी गेले. या समांतर सत्रात सर्वांनी आपापल्या क्षेत्रातील चालू असलेले काम , पुढील उद्दिष्ट , त्यासाठीचे नियोजन , पुढील भेटीगाठी याबाबत चर्चा केली. सत्रानंतर सर्वांनी सहभोजनाचा आनंद घेतला.
भोजनानंतर पं. रामदास पळसुले यांनी लय- ताल कार्यशाळा घेतली. तालाची भीती न वाटता त्याच्याशी खेळत - मैत्री करत तो शिकला पाहिजे असे ते म्हणाले. रियाजाचे छोटे छोटे विविध प्रकार त्यांनी उपस्थितांकडून करून घेतली. अशा रंगतदार कार्यशाळेनंतर त्यांनी श्री. मदन ओक व पं. रामदास पळसुले यांनी संतूर - तबला अशी झकास जुगलबंदी सादर करत कार्यक्रमात बहार आणली. हे स्वर मनात साठवत , सुहृदांच्या आठवणी घोळवत सर्वांनी एकमेकांना निरोप दिला.. पुन्हा भेटण्याचे आश्वासन देऊनच.
Good school