भरारी पथक, नुसतं नाव उच्चारलं तरी अंगात जोश येतो. शिवकाळात असल्यासारखं वाटतं.
ज्ञान प्रबोधिनीच्या निगडी केंद्राने ठरविले की आपण कोरोना काळात आता प्रत्यक्ष समाजामध्ये उतरून काम करणार आहोत. त्यातील एक अत्यंत महत्त्वाची मदत म्हणजे डबे आणि औषधे घरपोच पोहोचवणे. सगळ्या सदस्यांना साद घातली आणि म्हणता म्हणता भरारी पथकामध्ये २५हुन अधिक जण समाविष्ट झाले. पुरुषांबरोबर महिलाही पुढे आल्या आणि दादा, “आम्ही अमुक एक ठिकाणी जाऊ शकतो आम्हाला काम सांगा” त्यांची ही इच्छाशक्तीच बरेच बळ देऊ लागली.
भरारी पथक म्हणजे वेळेची शिस्त. योग्य वेळ आणि योग्य डबा यांची सांगड. यांचे नियोजन एवढे अचूक असते की आम्हाला भरारी मारण्यास कोणतीच अडचण येत नाही. कोण, केव्हा, कुणाकडे जाणार हे २ ते ३ तास आधीच ठरलेले असते. ज्यांना डबा द्यायचा त्यांची परिस्थिती जाणून घेतली जाते. उदा. किती जणांना करोना झाला आहे , लक्षणे असणारा आहे की नसणारा , डबा घरी द्यायचा आहे की खाली रक्षकाकडे दिला तरी चालेल, डबा घ्यायला कोण येणार आहे इत्यादी. या माहितीचा उपयोग स्वतःला जास्तीत जास्त सुरक्षित ठेवून डबा देण्यासाठी होतो.
सुरुवातीला ६ डबे मग १२ आणि आता तब्बल १९-२० डबे सकाळ-संध्याकाळ न चुकता आणि वेळेत पुरवणारे माझे सहकारी. एकेकाकडे बघूनच स्फुरण चढते, अभिमान वाटतो. सकाळ झाली की मी साने चौक, मी प्राधिकरण, मी यमुनानगर, अजून मला निरोप का नाही आला, दादा मी रावेत ला जाते, मी किवळे… अरे पण तू तर डांगे चौकात राहतो ना, पण मी जाईन असे त्यांचे नम्रपणे सांगणे अशा विविध संदेशांची नुसती रेलचेल असते.
सकाळची १२ ची वेळ आणि संध्याकाळी ७ वाजता.. डबे भरून तयार …. १०-१५ मिनिटात काही ठिकाणाहून तर दादा “डबा पोहोचला बरं का” असेही वाचायला मिळते. “जेवण खूप स्वादिष्ट आहे”, ज्ञान प्रबोधिनीच्या डब्यामुळे नवीन उत्साह येतो” असे काही प्रतिसादही वाचायला मिळतात, ऐकायला मिळतात. खरंच अन्नदाता सुखी भव अशीच भावना डबे घेणाऱ्याच्या डोळ्यात दिसते.
त्यामागचे कष्ट म्हणजे डबे तयार करणे, डबे भरणे, कोण कुठला डबा देणार त्याचे नियोजन, असे करताना काहीशी दमछाक होते पण जेव्हा “दादा डबा पोहोचला” असा निरोप येतो तेव्हा सर्व ताण निघून जातो. कोणा एकाचे नाव घेणार नाही कारण आम्ही सगळेच फिरते पथक आहोत आणि सेवाभावाने फिरणार असा जणू निश्चय सर्वानी केला आहे.
डबा घेणाऱ्या व्यक्तीशी दोन शब्द बोलावेत अशी इच्छा असते पण त्यातला धोका लक्षात घेता ते शक्य होत नाही. मग नुसता ‘👍’ दाखविला जातो. पण त्यातूनही एकमेकांच्या भावना पोहोचतात.
कोरोना रूग्ण लवकरात लवकर बरे व्हावेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
ते बरे होणे हीच आमची फलश्रुती आहे.
शब्दांकन – मिलिंद धारवाडकर, सुभाष वाटवे
सेवावाहिनी क्रमांक – 8390458155