आपली सेवावाहिनी सुरू होऊन आज दोन आठवडे पूर्ण होतायत. आज आपण एक वेगळा उपक्रम राबवला. मातृमंदिरात मोफत अँटीजेन चाचणी शिबिर आयोजित केले. वेळ ठरली. १६ मे , रविवार … सकाळी १० ते ५ …. आजकाल अनेक लोक सजग झाले आहेत. काही लक्षणं जाणवली तर स्वतः होऊन चाचणीसाठी पुढे येतात. पण बरेचदा होतं काय की तेवढा वेळ नसतो. आपण केवळ वीस मिनिटात रिपोर्ट देणार होतो. शिवाय रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाच तर आपल्याकडे उपचाराची सुविधा उपलब्ध आहेच की. शिवाय जिथे ही चाचणी केली जाते ते ठिकाण बरेचदा लांब असते त्या दृष्टीने अनेकांना आपले मातृमंदिर मध्यवर्ती भागात असल्याने सोपे जाणार होते. अनेकांना अत्यावश्यक कामासाठी बाहेरगावी जायचे असते तरीही हा रिपोर्ट आवश्यक असतो शिवाय हल्ली बऱ्याच सोसायट्यांमध्ये घरकाम करणाऱ्या व्यक्तींना चाचणी अहवाल जमा करणे बंधनकारक आहे. आणि जितक्या जास्त प्रमाणात चाचण्या होतील तितका प्रसार लवकर रोखला जाईल हे सर्वात महत्वाचे.
अँटीजेन टेस्ट करताना नाकातून एका अगदी छोट्या नळीने द्रव (swab) काढून त्याची चाचणी करण्यात येते. शरीरात प्रवेश करणाऱ्या विषाणूंच्या पृष्ठभागावर अँटीजेन्स असतात. आपलं शरीर या अँटीजेन्सना बाहेरून आलेला घटक म्हणजेच फॉरेन बॉडी म्हणून ओळखतं. या swab मध्ये कोरोनाचे विषाणू आहेत किंवा नाही हे या अँटीजेन टेस्टमध्ये कळतं. शिवाय या टेस्टचं सँपल तपासण्यासाठी प्रयोगशाळेत न्यावं लागत नाही. त्याची तिथल्या तिथे तपासणी करता येते. ही किट्स तुलनेने स्वस्त, लवकर निकाल देणारी आणि वापरायला सोपी असतात. असे अनेक मुद्दे लक्षात घेऊन ज्ञान प्रबोधिनी कोविड मदतकार्य संघ व ‘अ’ प्रभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हे चाचणी शिबिर आयोजित करण्यात आले.
आवश्यक ती सर्व प्रोसिजर अमोलदादाने पार पाडली…. मनपाच्या डॉ. साळवे यांनी परवानगी दिली. आणि सकाळी १० वाजता शिबिराची सुरुवात झाली. आपण तीन चार दिवसांपूर्वी तयार केलेला गूगल फॉर्म अनेकांनी भरला होता पण काही जण आयत्या वेळी पण येत होते. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन केले जात होते. मातृमंदिरात मनपाचे डॉक्टर PPE किट घालून टेस्ट करत होते. येणाऱ्या प्रत्येकाची माहिती नोंदवून घेतली जात होती. त्यांना टोकन देत होते व त्या टोकन नंबरनुसार एकेकाची चाचणी होत होती. अवघ्या २० मिनिटात रिपोर्ट मिळत होता. निगेटिव्ह रिपोर्ट मिळणारे खुश होत होते. (कोरोना आल्यापासून निगेटिव्ह – पॉझिटिव्ह शब्दांच्या अर्थामध्येच आता गल्लत होतीये अशी परिस्थिती आहे 😢) तरीही ज्यांना काही लक्षणे जाणवत होती त्यांना RT – PCR चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला जात होता.
दुपारी तीन वाजेपर्यंत साधारण ७० लोक येऊन टेस्ट करून गेले आणि केवळ तीन जण पॉझिटिव्ह आले. लगेच त्याबाबत आपल्या डॉक्टरांच्या टीमला कळवण्यात आले व त्यांच्यावर उपचार सुरूसुद्धा झाले. साधारण अडीचच्या दरम्यान एका संस्थेतून फोन आला की तिथे काही मुली पॉझिटिव्ह वाटत आहेत. संस्थाचालक स्वतः ऍडमिट … त्यामुळे तिथे स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या लोकांनी त्या मुलींना RSS च्या मदतीने विलगीकरणात ठेवूया असा विचार केला. पण त्यासाठी त्यांचे पॉझिटिव्ह रिपोर्ट आवश्यक होते. कर्मधर्मसंयोगाने आपल्याकडे आजच चाचणी शिबिर …. विवेकानंद केंद्राचे कार्यकर्ते प्रसाददादा या सगळ्या मुलींना रुग्णवाहिकेतून घेऊन आले. अंध – अपंग अशा या मुलींची चाचणी झाल्यावर ७ मुली पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. आपल्या डॉक्टरांनी आवश्यक ते सर्व सहकार्य करू असे आश्वासन दिले आणि या मुलींना SPM शाळेत RSS संचालित कोविड सेंटरमध्ये सोडण्यासाठी प्रसाददादा घेऊन गेले. आपल्या या शिबिरामुळे या मुली पॉझिटिव्ह असल्याचे कळले आणि इतर मुलींपासून यांना वेगळे ठेवणे शक्य झाले.
दिवसभरात अनेक स्वीगी – झोमॅटो मध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारे टेस्ट करण्यासाठी आले होते. ते सुपर स्प्रेडर ठरू शकतात. आपल्यामुळे कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी हे आपण होऊन टेस्ट करायला आले होते. घरकाम करणाऱ्या अनेक महिला येऊन गेल्या. एक तर ऐंशी वर्षांचे आजोबा … घराच्या इतकी जवळ टेस्ट होते आहे तर करून घेऊ म्हणून आले आणि रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर जबरदस्त खुश झाले. एका उच्चपदस्थ व्यक्तीला कंपनीत जमा करण्यासाठी हा रिपोर्ट लागत होता पण टेस्ट करायला जायला वेळ मिळत नव्हता … आज रविवार असल्याने त्यांना जमले.
खरं तर आज वातावरण अगदी खराब होतं. तौक्ते चक्रीवादळाचे पडसाद आपल्याकडे पण उमटत होते. रजिस्ट्रेशन करून सुद्धा सकाळी उपस्थिती अगदी कमी होती … मग आपल्या पालक संघाच्या शीतलताई तोडकर यांनी स्वतः सगळ्यांना फोन करून अक्षरशः बोलवून घेतले. आपले अध्यापक कार्यकर्ते प्रमोद सादुल व पालक संघाचे निलेशदादा राणे पूर्ण वेळ उभे राहून सर्व व्यवस्था बघत होते. भास्करदादा गोखले यांनी देखील स्वयंसेवकाची भूमिका अगदी चोख बजावली. डॉ. वैभव कर्णे , डॉ. पूजा खानापुरे आणि स्वप्नील जोशी या PCMC मधील स्टाफने अगदी उत्तम सहकार्य करत … १० ते ५ पूर्ण वेळ काम करत आजचे शिबिर सांभाळले. इतके सगळे हात दिवसभर सतत राबत होते. इतक्या वाऱ्या – पावसात सुद्धा तब्बल ८२ जणांची चाचणी झाली आणि त्यापैकी १० जण पॉझिटिव्ह आले. सगळ्यांवर ताबडतोब उपचार सुरू झालेले आहेतच. कोविड विरुद्धच्या लढाईत आपण .. ज्ञान प्रबोधिनी कोविड मदतकार्य संघ भक्कमपणे आपला कार्यभार सांभाळत आहे आणि या राष्ट्रकार्यात आपला वाटा उचलत आहे. या सगळ्यांच्या कार्याला सलाम 🙏🏻
शब्दांकन : शीतल कापशीकर
सेवावाहिनी : 8390458155