करोनाचे पहारे चौकाचौकात बसले आणि सगळेच जण आपापल्या घरात अडकून पडले. सुरुवातीचे काही दिवस चाचपडण्यात गेले. पण नंतर लवकरच ही खरी सुट्टी नव्हे, करोनाची साथ नसती तर शाळा अजून चालू असती हे लक्षात घेऊन ऑनलाईन शिक्षणाची विविध माध्यमे हाताळण्यास सुरुवात झाली. हळूहळू विविध प्रकारचे तंत्रज्ञान परिचित होत गेले; तसतसे त्याच्या वापराची दृष्टीही विस्तारत गेली. इयत्ता आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द झाल्या होत्या. त्यामुळे आमच्या पाचवी ते सातवी या पूर्व माध्यमिक विभागात अनुभव शिक्षणाचे विविध प्रयोग आम्ही सुरू केले. त्यातीलच काही प्रयोगांचा परिचय या लेखाद्वारे आपणास करून देत आहे.
आमच्या विभागात अभिव्यक्ती तासाच्या अंतर्गत सौ. मयुरी जेजुरीकर व सौ. मानसी फाटक या नाट्य विषय शिकवतात. त्यांना रोज एका गोष्टीचे प्रकट वाचन करून ती गोष्ट मुलांच्या WhatsApp ग्रुपवर पाठवण्यास सुचवले. दोघीही आनंदाने तयार झाल्या. इयत्ता सहावीसाठी त्यांच्या वर्गशिक्षिका सौ. स्वाती मोरे यांना या प्रयोगात सहभागी करून घेतले. पहिल्या आठवड्याची थीम सुद्धा निश्चित केली आम्ही. ‘भयकथा’ रोज रात्री दहा वाजता या गोष्टी मुलांच्या गटावर पोस्ट होऊ लागल्या. मुलांना भलत्याच आवडल्या या गोष्टी. मग आमच्या सर्व तायांचाही उत्साह वाढला. आणि मग गोष्टींना संगीताची साथ मिळू लागली आणि गोष्टींची परिणामकारकताही वाढली. या गोष्टींबाबत सातवीतील एका विद्यार्थ्याने प्रतिक्रिया दिली, ‘अजून काही दिवस अशा गोष्टी ऐकल्या तर स्वतःच्याच घरात आम्ही दबकत दबकत, घाबरत घाबरत चालू.
कथा वाचनाचा प्रयोग स्थिरावल्यावर सातवीसाठी काव्यवाचन हे सुरू केले. यासाठी युवती कार्यकर्त्या सौ. अनघा देशपांडे यांची मदत घेतली. सातवीच्या दोन्ही वर्गावर अनघाताई रोज सकाळी एक कविता टाईप करून पाठवायची. सोबतच त्या कवितेचा अर्थ सांगितलेली ऑडिओ क्लिपही असायची. हा अर्थ ऐकून तसे भाव त्या कवितेच्या वाचनात येतील असा प्रयत्न विद्यार्थी करायचे. तीन-चार वेळा सराव करून मग स्वतःच्या आवाजातील ती कविता ग्रुप वर पोस्ट करा असे मुलांना सांगितले होते. रोज सुमारे २५ ते ३० मुले कविता पोस्ट करू लागले. संध्याकाळी अनघा ताई या सर्व मुलांच्या कविता ऐकून त्यांना प्रतिसाद देत होती. सुधारणाही सुचवत होती. प्रत्येकाला वैयक्तिक स्वरूपाचा प्रतिसाद मिळू लागल्याने मुलांचा उत्साह टिकून राहिला व दिवसागणिक त्यांचे काव्यवाचनही प्रभावी होत गेले. २१ चालला हा प्रयोग. यात एक दिवस स्वतः कविता शोधून ती रेकॉर्ड करून पाठवणे; तर एक दिवस कवितेची एक ओळ दिली असता ती कविता पूर्ण करणे आणि मग स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करून पाठवणे असेही प्रयोगाने घेतले अनघाने. या २१ दिवसात इंदिरा संत यांची बाभळी, ग. दि. माडगूळकर यांची कुंभारासारखा गुरु, विंदा करंदीकर यांची देणाऱ्याने देत जावे, कुसुमाग्रज यांची जालियनवाला बाग, अण्णाभाऊ साठे यांची जग बदल घालुनी घाव, मंगेश पाडगावकर यांची नवा दिवस अशा अनेक कवितांना स्पर्श झाला. या प्रयोगातील शेवटची कविता होती ना. धों. महानोर यांची. शब्द होते,
सूर्यनारायणा नित नेमानं उगवा
अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा
सध्याच्या पार्श्वभूमीवर हा योगायोग मन प्रसन्न करून गेला. प्रयोगाची समाप्ती झाल्यावर विद्यालयातील संगणक विभागाच्या प्रमुख सौ. अनुजा भंडारी यांच्या सहकार्याने या सर्वांचे एक ऑडियो बुकही तयार केले गेले. याला अनघाने नाव दिले ‘हसरी बोलफुले’. या ऑडिओ बुकमुळे कवितांचं, त्यांच्या अर्थांचं संकलन झालं, हे सर्व संकलन केव्हाही वापरायला उपलब्ध झालं आणि मुख्य म्हणजे मुलांना प्रोत्साहन मिळालं. या पुस्तकासाठी विद्यालयाची माजी विद्यार्थिनी वेदांगी कुलकर्णी व अध्यापिका सौ. स्मिता माने यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
आमच्या आणखी अध्यापिका वृषाली डेंग्वेकर. छान छान लिहितात छोट्या मुलांसाठी. त्यांना चारोळी लेखन कसं करायचं अस एक सत्र झूम वरती घ्यायला सांगितलं. सहावीतील सुमारे ६० तर सातवीतील ४० विद्यार्थी या सत्राला उपस्थित होते. छान झालं सत्र. वृषाली ताईंनी रविवार आणि पक्षी हे विषय मुलांना चारोळी लेखनासाठी दिले. मुलांनीही याला उत्तम प्रतिसाद दिला. एक नमुना चारोळी –
दिवस आहे सवडीचा
रविवार आमच्या आवडीचा
नसते शाळा नाही ज्यादा तास
जेवणातही असतो बेत खूप खास.
एके दिवशी एक फोटो देऊन त्यावर चारोळी करण्यास सांगितले. तर एक दिवस हव्या त्या विषयावर कविता करा असेही सांगितले. या सगळ्याचेही संकलन करण्याचे मनात आहे.
एक सत्र मीही घेतलं. मौनसंवाद लेखनाचं. इयत्ता सहावी तील ४० पेक्षा अधिक विद्यार्थी सत्राला उपस्थित होते. मौनसंवाद… दुसऱ्याच्या भूमिकेत शिरून स्वतःच्याच मनाशी विचार करण्याचं तंत्र. या तंत्राचे स्पष्टीकरण, त्याची उदाहरणे, कुणाकुणाशी करू शकतो असं सगळ्या सत्रामध्ये मुलांना समजावून सांगितलं. आणि तीन विषय दिले मुलांना – दप्तर, आरसा आणि घड्याळ.
एका विद्यार्थिनीने घड्याळाशी केलेल्या मौनसंवादाचा काही अंश –
मुलगी – काय रे दिवसभर हात हलवून कंटाळा येत असेल ना तुला?
घड्याळ – कंटाळा? अगं माझे हात खूप ठणकत लागतात. पण विश्रांती घेईल तर वेळेचा साक्षीदार ठरेल का मी? मुलगी – हं खरं आहे.
घड्याळ – पण तुला एक गंमत सांगू का? सगळीकडे एकच एक वेळ न.
मुलगी – काय? हे कसं काय?
घड्याळ – तुझा भूगोलाचा अभ्यास बहुधा राहिला आहे. कर तो आधी म्हणजे समजेल तुला…
आत्तापर्यंत ज्या कृती आम्ही मुलांना करायला दिल्या होत्या त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी एकट्यानेच करायच्या होत्या. पण अशी एखादी कृती देता येईल का की ज्यात सगळ्यात घरच्यांचा सहभाग असू शकेल; असा विचार करताना एक कल्पना सुचली. आमच्या नाट्य विषय शिकवणाऱ्या अध्यापिका मयुरीताई यासाठी जाहिरातीचे एक तंत्र त्यांच्या तासाला वापरतात. ते एकदम आठवलं. आणि मग त्यांच्याच सहकार्याने एक उपक्रम जाहीर केला. कोणत्याही एखाद्या वस्तूची घरातील सर्वांच्या सहभागातून छानशी जाहिरात तयार करायची. आणि रेकॉर्ड करून त्याची क्लिप ग्रुपवर पाठवायची. हा उपक्रमही जोरदार उचलून धरला मुलांनी. सहावीतून ३६ तर सातवीतून २० पेक्षा अधिक जाहिराती आल्या. मजा आली खूप.
आमच्या अनुभव शिक्षणाच्या रोजच्या यादीमध्ये घरातील एक काम मुलांना करण्यासाठी देत होतो. घर झाडण्यापासून ते कपडे घुण्यापर्यंत अनेक गोष्टी पहिल्या २० दिवसात मुलांनी केल्या होत्या. त्यामुळे कामाचा काही अनुभव त्यांच्या गाठीशी नक्की होता. मग या जोरावर एक गोष्ट ठरवली,
पहिल्या लॉक डाऊनचा शेवटचा दिवस
आई पालकांच्या आरामाचा दिवस…
घोषणा तयार झाली होती. अचानक जाहीर करण्यापेक्षा तीन दिवस आधीच याची पूर्वसूचना दिली. बारीक-सारीक कामांची यादी करून ग्रुप वर पोस्ट केली. थोडी थोडी करता करता तब्बल २८ घरकामे निघाली. जी कितीही म्हटलं तरी टाळता येत नाहीत. अट होती आई, आजी, काकू या कुणाचीच मदत घ्यायची नाही. फक्त मुला-मुलींनी व घरातील पुरुष मंडळींनी मिळूनच घरातील सगळीच किंवा अधिकाधिक कामे पूर्ण करायची. हे प्रत्यक्षात येण्यासाठी पूर्वतयारीचे तीन दिवस वापरायचे. न्याहारी, जेवणातील काही शिकून घ्यायचे असेल तर ते शिकून घ्यायचे. नियोजन करायचे. खातेवाटप करायचे.
१४ एप्रिलचा दिवस उजाडला आणि ग्रुपवर मुलांचे msg यायला सुरुवात झाली. चहा बनवला, अंगण झाडून रांगोळी काढली, पाणी भरले, झाडांना पाणी दिले… एकूण काय मुलांनी योजना खूपच मनावर घेतली होती तर. यादीनुसार केलेल्या कामांचा मुले अक्षरशः फडशा पाडत होती. इतकेच नाही तर न्याहारी आणि जेवणाचे भारीभारी बेत ठरवले होते मुलांनी. गुलाबजाम पासून ते मँगो सरबत पर्यंत आणि शेवभाजी पासून ते रगडा पॅटीस पर्यंतची धामधूम स्वयंपाक घरात चालू होती.
‘मे महिन्याच्या सुटीत माहेरी जाऊन जाऊन जे सुख मिळतं ते सुख आज मुलांनी देिलं.’
‘आज मुलांना घरी आई काय काय करते ते समजलं. अन्नाची किंमत समजली. कष्ट समजले आणि घर कामातही किती व्यवस्थापन लागतं हेही समजलं.’
आई पालकांचे गटावर अभिप्राय यायला सुरुवात झाली होती.एका विद्यार्थ्याने तर आईला खीर आवडते म्हणून खिरीची रेसिपी आईला न विचारता गुपचूप आजीला विचारू दुपारच्या जेवणासाठी केली होती. एका आई पालकांनी कवितेतून आपल्या भावना व्यक्त केल्या. कवितेचा शेवट होता,
आला असा दिवस एक
ती झाली माय मी तिची लेक.
लॉकडाऊन संपेपर्यंत हे प्रयोग सुरू ठेवायचे असे आम्ही ठरवले आहे. सुमारे महिनाभर या गोष्टी केल्यानंतर हे तंत्र अधिक प्रभावीपणे वापरायचे असेल तर काही गोष्टी अध्यापक म्हणून जरूर लक्षात घेतल्या पाहिजे असेही समजत गेले. त्या गोष्टी सांगून या लेखाचा समारोप करतो.
१. सुरुवातीला दिवसातून वेगवेगळ्या वेळेस आम्ही कृती पोस्ट करत होतो. त्यामुळे नवीन काही कृती आली का हे पाहण्यासाठी मुले सतत मोबाइल हाताळत आहेत अशा प्रतिक्रिया आल्या. मग सकाळी आठच्या सुमारास एकाच वेळी सर्व कृती देण्यास सुरुवात केली. याचा उपयोग असा झाला की मुलांना त्यांच्या दिवसाचे नियोजन करणं सोयीचं गेलं. जसे की एकूण किती कृती आजसाठी सांगितल्या आहेत? या सर्व कृती करण्यासाठी किती वेळ लागणार आहे? दिवसातील कोणत्या वेळेत कोणती कृती करता येतील? असे दिवसाचे नियोजन करणे मुलांना सोयीचे गेले.
२. या कृतींमध्ये मोबाईलचा वापर करून बघण्याच्या गोष्टी किती? ऐकण्याच्या गोष्टी किती? आणि मोबाईलचा वापर न करता करण्याच्या गोष्टी किती? यांचाही योग्य तो समन्वय असला पाहिजे असे लक्षात आले.
३. कृती करून झाल्यावर ग्रुपवर आवर्जून प्रतिसाद द्या असे मुलांना सांगितले होते. त्यानुसार मुलांचे प्रतिसाद येऊ लागले. या प्रतिसादांचा रसग्रहण, मूल्यमापन झालं नाही तर मुलांचा उत्साह टिकणार नाही असे लक्षात आले. त्यासाठी वर्गशिक्षकांनी दर दोन-तीन तासांनी आपल्या वर्गाच्या ग्रुपवर येऊन त्या वेळेपर्यंत कृती केलेल्या मुलांना प्रतिसाद द्यावा आणि मुलांचा उत्साह वाढवावा असे ठरवले. या गोष्टीचाही परिणाम जाणवला. प्रतिसाद देणाऱ्या मुलांची संख्या वाढली.
४. कोणतीही नवीन गोष्ट सुचली आणि करायला लागलो की कै. पोंक्षे सर आठवतात. ते नेहमी म्हणायचे, ‘नवीन उपक्रम जरूर करा पण त्यांच्या नोंदी कशा करणार आहात? कोणते घटक मोजणार आहात? याचाही पहिल्यापासूनच विचार करा.’ त्यामुळे हा विचार मनात चालूच होता. मग सर्व ग्रुपवर पालकांना सहकार्याचं आवाहन केलं. पालकांनीही तत्पर प्रतिसाद दिला. मग त्या पालकांना एकेका वर्गाच्या एक्सेल शीट तयार करण्यास सांगितले. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी कृती केली की त्याच्या नावा समोर त्या कृतीच्या नावाखाली टीक करण्यास सुचवले. यातून आम्हाला ही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. जसे की एकुण विद्यार्थी संख्या पैकी किती विद्यार्थी प्रतिसाद देत आहेत? किती विद्यार्थी सर्व कृती करत आहेत? कोणती कृती खूपच कमी जण करत आहेत? यावरून आम्हालाही आमचं नियोजन करण्यासाठी एक दिशा मिळाली.
५. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर्गशिक्षकांना रोज एक-दोन विद्यार्थ्यांशी फोनवर संपर्क करण्यास सांगितले. रोज कोणाला संपर्क झाला ती नावे अध्यापकाच्या ग्रुपवर पोस्ट करायला सांगितले. शिक्षकांचा प्रत्यक्ष संपर्क मुलांचा उत्साह वाढून गेला.त्यांना आनंद देऊन गेला. धीर देऊन गेला. या काळात केलेल्या संपर्कामुळे व्यक्तिगत नातेही निर्माण होण्यास मदत होईल असे जरूर वाटते.
या सर्व बाबतीतील आपलेही अनुभव समजल्यास ही साधने अधिकाधिक परिणामकारकपणे वापरता येतील आणि घरातूनही उत्तम प्रकारचे अनुभव शिक्षण देता येऊ शकेल असे वाटते.
प्रतिसादाच्या अपेक्षेत….
शिवराज पिंपुडे
विभागप्रमुख,
पूर्व माध्यमिक विभाग,
ज्ञान प्रबोधिनी, निगडी केंद्र
Shivraj dada,
You did a great job in lock-down 1. Both, students and parents were busy whole day following your activities. It was a good fun and learning for students.
Thanks.
Dear Sir,
As a parent we are very grateful to you for the fantastic job done by the entire fraternity of JPNV during the pandemic of COVID -19 .