नजरेपुढती वाटा खडतर हाताशी केवळ निर्धार ।
स्वप्न उद्याच्या उजळ दिसांचे जिद्दीने करूया साकार।
दोन दिवसांपूर्वी एक फोन आला होता. मारुंजी गावातून… एका जोडप्याला गेले पाच दिवस सतत ताप आणि खोकला जाणवत होता. त्यांना कुठूनतरी आपल्या सेवावाहिनीबद्दल माहिती मिळाली व त्यांनी फोन केला. ते सांगत होते की आता ते बरे आहेत पण त्यांच्या २२ वर्षाच्या मुलाला पण गेले पाच दिवस ताप – खोकला आहे. ते स्थानिक डॉक्टरांकडे उपचार घेत आहेत पण त्या मुलाच्या तब्येतीत विशेष सुधारणा दिसत नाहीये. हा कॉल डॉक्टर बागेश्री यांच्याकडे गेला आणि त्यांनी फोनवर विचारणा करत तपासणी सुरू केली.
त्या मुलाची ऑक्सिजन पातळी विचारली असता त्यांना सांगता झाली नाही. त्यांना ऑक्सिमीटर घेऊन या व ऑक्सिजन पातळी मोजा असे त्यांना सांगितल्यावर ते म्हणाले की ते ऑक्सिमीटर विकत घेऊ शकत नाहीत. अजून चौकशी केली असता लक्षात आले की त्यांना वाटले की आपल्याकडे औषधोपचार विनामूल्य आहेत (थोडक्यात काय तर औषधे मोफत मिळतील असे वाटले) म्हणून त्यांनी फोन केला होता. महागडे औषधोपचार त्यांना परवडणारे नव्हते. लॉकडाऊनचा आर्थिक फटका त्यांच्या कुटुंबाला बसला होता. गेले ७ महिने त्यांना पगारच मिळालेला नव्हता.
हे सगळं कळल्यावर आपण फक्त फोनवरून उपचार काय असावेत याबाबत सल्ला देतो , प्रिस्क्रिप्शन लिहून देतो , औषधे पोहोचवतो पण औषधांचे पैसे रुग्णांना भरावे लागतात हे सांगायचे जीवावर आले होते डॉक्टरांच्या. मोठा पेच होता पण अडचणीतून मार्ग तर काढायला हवाच की. तिथल्याच डॉक्टरांकडे जाऊन ऑक्सिजन पातळी मोजायला सांगितली असता ती ८८ आहे असे त्या मुलाने सांगितले. त्या मुलाची ऑक्सिजन पातळी खालावते आहे हे बघून आपल्या वैद्यकीय समन्वयक डॉ. मेघा यांनी त्याला ताबडतोब रुग्णालयात भरती होण्याचा सल्ला दिला. परंतु काही केल्या हा मुलगा ऍडमिट व्हायला तयार होईना. चार समजुतीच्या गोष्टी सांगून कसंबसं त्याचं मन वळवण्यात डॉ. मेघा यांना यश आलं आणि त्याला जम्बो कोविड सेंटरला भरती करण्यात आलं. पण तोवर त्याची ऑक्सिजन पातळी ६० पर्यंत घसरली होती.
आता त्याला व्हेंटिलेटरवर ठेवणे आवश्यक होते. अमोलदादाच्या सहकार्याने काल मध्यरात्री त्याला व्हेंटिलेटर बेड मिळाला आणि हुश्श ! त्या मुलाने वडिलांशी विडिओ कॉलवर संपर्क केला आणि आईवडिलांना थोडेसे हायसे वाटले. या केसमध्ये involve असणारे सगळे डॉ. बागेश्री, डॉ. मेघा, बेड मिळवून देणारा अमोलदादा, समन्वयक आनंददादा हे सगळे रात्री एक वाजेपर्यंत जागे होते. कर्तव्यपूर्ती केल्याचं आगळं समाधान सगळ्यांना मिळालं होतं. आपण सगळे मिळून त्या मुलाच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करूया असे आवाहन या टीमने केले आहे.
खरं तर ही सेवावाहिनी सुरू केली तेव्हा कसा प्रतिसाद मिळेल , आपल्याला नक्की काय करावे लागेल हे काहीच निश्चित नव्हते फक्त आपलं काम आपण चोख करायचं हे मात्र प्रत्येकाने नक्की ठरवलं होतं. परिस्थिती गंभीर असताना आपण खंबीर राहात रुग्णांची मदत करायची हा ध्यास सगळ्यांनी घेतला होता. वाट अवघड असली तरी उद्याची सोनेरी पहाट नजरेसमोर तरळत होती.
शब्दांकन : शीतल कापशीकर
सेवावाहिनी : 8390458155