जनरली जेव्हा ग्रॅज्युएशन पूर्ण होते तेव्हा नवीन वाटा , व्यवसाय / नोकरीतून मिळणारा पैसा अशी स्वप्ने बघत व या स्वप्नपूर्तीसाठी आपल्या शिक्षणाचा उपयोग करत आपला प्रवास सुरू होतो. पण वैद्यकीय शाखेचे (मेडिकल) विद्यार्थी मात्र जरा वेगळा विचार करतात. त्यांनी महाविद्यालयातून बाहेर पडताना एक शपथ घेतलेली असते. त्यांच्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग रोगनिदान करण्यासाठी व रुग्णसेवेसाठी करण्याची. ही शपथ आयुष्यभर उराशी बाळगून ते या क्षेत्रात काम करतात. आपल्या सेवावाहिनीला मिळालेली वैद्यकीय पथकाची अमूल्य साथ … त्यांच्याप्रति लोकांना वाटणारा विश्वास … हे खरं तर शब्दातीत आहे. पण तरीही हा अल्पसा प्रयत्न …
डॉक्टर काळे पती – पत्नी …. कोविडच्या पहिल्या लाटेपासून दोघेही अविरत रुग्णसेवा करत आहेत. आत्ता आपल्या सेवावाहिनीच्या कामात पण योगदान देत आहेत. आपल्या प्रबोधिनीतील एक अध्यापक त्यांच्या आईसाठी बेड शोधत होते. त्यांचा Hrct score १० … वय पण जास्त … त्यातले त्यात लसीचा एक डोस झालाय ही समाधानाची बाब. डॉ. अतुल काळे यांनी सर्वप्रथम आपण घरीच उपचार करूया हे सांगून सरांना आश्वस्त केले आणि त्यांच्या आईला ट्रीटमेंट सुरू केली.
आईला बीपी , शुगर वगैरे आरोग्यशत्रूंची साथ होतीच पण डॉक्टरांनी आयुर्वेदिक औषधांनी त्या पूर्ण बऱ्या होतील हा मानसिक आधार दिला. शिवाय मदतीला डॉ. प्रतिमा काळे यांनी ऍलोपॅथीची औषधे दिली. दोन तीन दिवसांत आईंच्या तब्येतीत चांगला फरक दिसून आला.
पुढे आपल्या अजून एका अध्यापकांच्या सासूबाई … वय ६५ … बाकी सर्व गोष्टी वरीलप्रमाणेच … यांना देखील उपचार देऊन कोरोनामुक्त केले. आयुर्वेदिक औषधे किती प्रभावी आहेत हे आपण रविवारच्या वेबिनारमध्ये ऐकलेच की. भीमसेनी कापूराचा वाफारा , काढा तसेच अन्य औषधांचा वापर करत आणि त्याच बरोबर रुग्णांना मानसिक आधार देत काळे पती पत्नी या कोविड संकटात आपले वैद्यकीय ज्ञान वापरत योगदान देत आहेत. डॉ. अतुल काळे यांनी hrct score १४ पर्यंत असलेले रुग्ण घरीच बरे केले आहेत. ते स्वतः MD .. फिजिशियन असल्याने त्यांचा अभ्यास पण बराच आहे. विविध व्याधींवर अजून काय काय उपचार करता येतील याबाबत त्यांचे त्यांच्या टीमबरोबर सतत संशोधन सुरू असते. राष्ट्रीय संशोधन कार्यातील त्यांच्या कामाची दखल आयुष मंत्रालयाने देखील घेतली आहे.
मोफत किंवा नाममात्र फीमध्ये वैद्यकीय सेवा देणे हे तर डॉ. प्रतिमा काळे यांचे वैशिष्ट्य म्हणता येईल. अत्यंत संवेदनशील मनाच्या प्रतिमाताई प्रत्येक रुग्णासाठी (तो अनोळखी असला तरीही …) अगदी मनापासून झटतात. रेमडेसीवीर इंजेक्शनची सोय करणे असो किंवा हॉस्पिटलमध्ये बेड मिळवून देणे असो त्या सर्वतोपरी प्रयत्न करतात. एवढेही करून रुग्ण दगावला (अनेक वेळा औषधोपचार उशिरा सुरू झाल्यावर दुर्दैवाने ही वेळ येते 😢) तर त्यांना स्वतःला हतबलता जाणवते. पण पुन्हा त्या जिद्दीने उभ्या राहतात … पुढच्या रुग्णाच्या सेवेसाठी.
आपली बाहेरची प्रॅक्टिस सांभाळून आपल्या सेवावाहिनीच्या कामात पण काळे दाम्पत्याचे योगदान महत्वाचे आहे.
अशा सेवाभावी डॉक्टरांना देवदूत म्हटले जाते … ते या कोरोना महामारीत रुग्णांच्या हाकेला धावून जात त्यांच्या प्राणांचे रक्षण करत आहेत. त्यांच्या कर्तृत्वाला सलाम 🙏🏻🙏🏻
शब्दांकन : शीतल कापशीकर
सेवावाहिनी : 8390458155