कोरोना टेस्ट केलीये ….रिपोर्ट पॉझिटिव्ह …
उंचावलेल्या भुवया …त्रासलेला चेहरा …चढलेला पारा …
गृह विलगीकरणात जेव्हा एखादी व्यक्ती असते तेव्हा त्या व्यक्तीची ही स्थिती असते आणि इतरांना ब्रह्माण्ड आठवत असते. स्वतःला कोरोना झालेला परवडला असं देखील मनात येतं क्षणभर. आणि त्यातून घरात दोघेच असतील तेही ज्येष्ठ नागरिक मग काय विचारता? असाच एक अनुभव आपल्या पूर्वाताईने घेतलाय. आजोबा पॉझिटिव्ह – वय वर्षे पंच्याहत्तर. आजी सगळं निगुतीने करतायत पण आजोबांची सतत चिडचिड , त्रागा. सुदैवाने त्यांना अन्य काही जास्त त्रास होत नव्हता. फक्त त्यांचे मन सांभाळायचे होते. पूर्वाताईने फोन केल्यावर ते आजोबा पहिल्यांदा वैतागलेच – जाम बोलले नाहीत – सरळ फोन आजींकडे देऊन मोकळे झाले. आजी एकदम सावध पवित्र्यात. हो … हल्ली फेक कॉल प्रकरण बोकाळालंय ना खूपच. त्यामुळे unknown नंबरवरून येणाऱ्या फोनची भीती वाटणे अगदी स्वाभाविक आहे. पूर्वाताईने ज्ञान प्रबोधिनीतून बोलतीये असं सांगितल्यावर मात्र त्या अगदी निर्धास्त झाल्या आणि बोलू लागल्या. आजोबांना खोलीत कोंडून ठेवलंय असं वाटत होतं पण करणार काय ?
विलगीकरणाच्या दृष्टीने ते योग्य आणि आवश्यक होतं. पण त्यामुळे त्यांची चिडचिड होत होती. पूर्वाताईने त्यांना हळुवारपणे तुम्हाला काय काय आवडतं ते विचारलं. माझे सासू सासरे तुमच्याच वयाचे आहेत त्यामुळे मी तुमची स्थिती अगदीच समजू शकते असं ती म्हणाल्यावर आजी भरभरून बोलू लागल्या. जुजबी व्हाट्सअप्प त्यांना वापरता येत होते. त्यावर छान छान गाणी पाठवते ती आजोबांना ऐकवा असं तिने सांगितले. खाणेपिणे , औषधपाणी याची चौकशी केली. आजी खुश झाल्या. दोन तीन दिवसांनी परत फोन केल्यावर आजोबा स्वतः भरभरून बोलले. आजींना सुद्धा आश्चर्य वाटले की ते इतके कुणाशी बोलताहेत. अगदी राजकारणापासून उन्हाळा किती वाढलाय असे सर्व विषय हाताळून झाले आणि एक सकारात्मक ऊर्जा संक्रमित झाली. आपल्या सेवावाहिनीने मानसिक आधार देण्याचे काम केले होते.
असाच एक प्रसंग … आपल्या परिवारातलाच … पूर्वाताईने एका विद्यार्थ्याला फोन केला असता समजले की त्याचे आई बाबा दोघेही पॉझिटिव्ह , आई घरीच विलगीकरणात तर वडील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट. आणि ही दोन्ही मुलं शेजारी राहत होती. मग तिने आईला फोन केला , डबा पाठवते म्हणाली तर त्या म्हणाल्या … एकटीला घर खायला उठतंय हो ताई , लेकरांना बघून खूप दिवस झाले असं वाटतंय. डबा नकोच – जेवण घशाखाली उतरत नाही. पूर्वाताईने समजावले – असं करून कसं चालेल ? या लेकरांसाठीच तर तुम्हाला लवक्कर बरं व्हायचंय. चला मी तुम्हाला दोन तीन पाककृती सांगते. आणि असं करता येईल का ? मुलांना बाहेरच्या ओट्यावर बोलवून घ्या आणि गप्पा मारा त्यांच्याशी अर्धा तास ही मात्रा तर फारच लागू पडली. मुलांशी बोलल्यावर त्यांना बरंच बरं वाटलं. त्यानंतर दररोज दुपारी चार वाजता या दोघी मस्त गप्पा मारायच्या. मनाचे श्लोक , अभंग , उपासना कितीतरी गोष्टींबद्दल पूर्वाताई बोलली त्यांच्याशी. बोलण्यात कोरोना बद्दल चकार शब्द नाही. दोन तीन दिवसांनी त्या बाई म्हणाल्या की मी रोज चार वाजायची वाट बघत असते.
पुढे ते दोघे बरे झाले. शेजाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत मुलं घरात आली पण लगेचच त्यांच्यावर दुसरा मोठा आघात झाला. त्या बाईंच्या बहिणीचा कोरोनाने बळी घेतला. बहीण ऍडमिट झाल्यावरच त्या बाईंनी स्वतः पूर्वाताईला फोन केला आणि सगळी परिस्थिती सांगितली. म्हणाल्या … घरात दुर्घटना घडणार आहे हे मला कळून चुकले आहे. फक्त ते दुःख पचवण्याची शक्ती मला मिळावी यासाठी आपण उपासना करूयात. पूर्वाताई निःशब्द … दुसऱ्या दिवशी सकाळी त्या विद्यार्थ्याने फोन करून ती वाईट बातमी दिलीच. पण उपासनेमुळे त्या सगळ्यांना एक मानसिक बळ मिळाले होते.
कोरोना हा आजार जितका शारीरिक तितकाच मानसिक. चित्तवृत्ती प्रफुल्लित असतील तर या आजारावर मात करणे सोपे जात आहे. आपली सेवावाहिनी कोरोना रुग्णांचे , त्यांच्या नातेवाईकांचे मनोधैर्य उंचावण्याचे काम मनापासून करत आहे. हीच खरी जीवभावे शिवसेवा 🙏🏻🙏🏻
शब्दांकन : शीतल कापशीकर
सेवावाहिनी : 8390458155