त्या रस्त्यानं सध्या गेलो की मस्त सडा पडलेला दिसतो.
अगदी सहज गाडीचा वेग कमी होतो.
क्षणभर तो सडा डोळ्यांत साठवण्याचा प्रयत्न होतो.
डोळ्यांत साठलेल्या त्या फुलांचा सुगंध मनभर जाणवतो.
त्या सड्याच्या रूपातून पारिजातक मला काही तरी सांगतोय असं प्रत्येक वेळी तो सडा पाहताना वाटायचं.
पण नेमकं काय सांगतोय ते माझ्यापर्यंत पोहोचायचं नाही.
राममंदिराच्या भूमिपूजन प्रसंगी मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी पारिजातकाचं रोप लावलं;
आणि हा वृक्ष भलताच चर्चेत आला.
योगायोगानं आईनं मला एक व्हिडिओ पाठवला.
खूपच सुंदर व सविस्तर वर्णन होतं त्यात पारिजातकाचं.
म्हणजे पारिजातकाच्या जन्माच्या पौराणिक कथांपासून ते त्याच्या आयुर्वेदिक उपचारांपर्यंत… सबकुछ.
त्यातील एक आख्यायिका म्हणजे १४ वर्षांच्या वनवासानंतर सीतेने झाडापासून आपसूक गळून पडणाऱ्या फुलांची इच्छा दर्शवली.
तेव्हा श्रीरामांनी पारिजातकाची फुले आणून दिली म्हणे.
हा व्हिडिओ पाहत असताना अचानक पारिजातक मला काय सांगू पाहतोय याची जाणीव माला झाली.
लगेच गुगलबाबांच्या आश्रयाला गेलो.
पण मी जे शोधत होतो ते काही मला सापडलं नाही.
पारिजातकाची फुले रात्री उमलतात व पहाटे सडा पडतो.
असाच उल्लेख सगळीकडे वाचायला मिळाला.
मला नेमकी वेळ हवी होती.
ती काही मला मिळत नव्हती.
पारिजातक मला हेच तर सांगत होता.
…माझ्या फुलांच्या बरसण्याची वेळ शोध मित्रा.
झटकन सहावी, सातवीच्या वर्गावर msg पोस्ट केला.
कुणाच्या अंगणात किंवा घरासमोर पारिजातक आहे का?
२१ जणांचे प्रतिसाद आले की.
मग त्या २१ जणांना वैयक्तिक msg पाठवला.
…मुलांनो पारिजातकाच्या फुलांचा पहाटे किती वाजता सडा पडतो अशी काही माहिती उपलब्ध नाहीये. किंवा असली तरी ती आपल्याला आपल्या निरीक्षणातून शोधून काढायची आहे. त्यासाठी एक रात्र तुम्हाला कमी झोपावं लागेल आणि निरीक्षण करत जागावं लागेल. पण मजा येईल तुम्हाला. तुमच्या घरच्यांना चालणार असेल तर त्यांच्या परवानगीनं आणि त्यांच्या सोबतीनं अशी एक रात्र पारिजातकाच्या सहवासात घालवणार का?
चार जण गळाले की लगेच.
उरलेल्यांसाठी पाच प्रश्न पाठवले.
१. फुले किती वाजता उमलायला सुरुवात होते.
२. किती ते किती फुले उमलत असतात?
३. फुले किती वाजता पडायला सुरुवात होते?
४. सडा किती वेळ पडत राहतो?
५. रात्री झाडावर उमलेलं फूल आणि पहाटे गळून पडलेलं फूल यात काही फरक जाणवतो का?
एका शनिवारची रात्र निश्चित केली आम्ही.
पण रविवारी मुलांसाठी एक व्याख्यान ठरल्यानं तो दिवस (क्षमस्व. ती रात्र) रद्द करावा लागला.
पुढे गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली;
अन् सगळंच बारगळलं.
मग मदतीला आली शाळेतील भविष्यचिंतन बैठक.
सर्व अध्यापकांसाठी दोन दिवसांची बैठक होती.
त्यामुळे मुलांना सुट्टी होती.
यातल्या पहिल्या दिवसाची आम्ही निश्चिती केली.
सांयकाळी सात ते सकाळी ६ पर्यंत मुलांनी निरीक्षणं करावीत,
या मुलांचा स्वतंत्र whatsapp ग्रुप तयार केला होता;
त्यावर फोटो पोस्ट करावेत,
निरीक्षणे मांडावीत,
गप्पा माराव्यात असं सुचवलं.
दोन अध्यापकांना मदतीला घेतलं.
मुलांनी पूर्ण रात्र जागायची होती.
आम्ही अध्यापक ३३ तासच त्यांना सोबत करणार होतो.
दुसऱ्या दिवशी उघड्या डोळ्यांनी भविष्य चिंतन करायचं होतं ना.
संध्याकाळी सात वाजल्यापासूनच मुलांचे msg सुरु झाले.
ताई दोन फुले उमलली, चार फुले उमलली.
मुलांना जागते ठेवण्यासाठी दीपालीताई व स्मिताताईनी झूमची लिंक पाठवली.
त्यावर त्यांच्या मस्त गप्पा झाल्या म्हणे मुलांशी.
माझी वेळ रात्री ३ ते सकाळी ६ अशी होती.
गजर झाल्याझाल्या उठलो.
जाम उत्सुकता होती.
पाचच मिनिटात म्हणजे मध्यरात्री ३ वाजून ५ मिनिटांनी एक msg आला.
दादा एक फूल पडलं.
कोण आनद झाला सगळ्यांना.
सगळे म्हणजे आम्ही पाचजण.
चार विद्यार्थी – राघव, अनिषा, अदिती, राधा – आणि मी.
बाकीच्यांची विकेट पडली होती.
सव्वातीन वाजता दुसरा msg आला.
दादा दोन फुले गळाली.
फुले गळून पडण्यास सुरुवात होण्याची वेळ लक्षात आली होती तर आमच्या.
इतक्या रात्री झूमवर गप्पा करणं मला शक्य नव्हतं.
मग झाडासोबत एक सेल्फी घ्या.
मस्त चहा किंवा कॉफी करा.
घरच्यांसोबत चहा घेतानाचा एक फोटो पोस्ट करा.
असं काहीबाही सांगून मी ग्रुप व मुलं जागती व हालती ठेवण्याचा प्रयत्न केला.
मुलांनो अन्य निरीक्षणेही सुरु ठेवा. कीटक, प्राणी इत्यादी.
हो दादा आत्ताच चिचुंद्री दिसली.
आदिती चिवचिवली.
दादा माझं निरीक्षण – आज पौर्णिमा आहे.
चंद्राचा फोटो पाठवत राघव ग्रुपवर पुटपुटला.
अहाहा खासच की.
विशेष होतं हे निरीक्षण.
पौर्णिमेच्या प्रकाशात पारिजातकाच्या फुलांची परसात पडण्याची वेळ आम्ही शोधत होतो तर.
राघवनं अजून एक फोटो पोस्ट केला.
त्यात चार पारिजातकाची फुले ओळीत मांडली होती.
आणि खाली लिहिलं होतं प्रत्येक फूल वेगळं आहे.
मला काही अर्थ लागला नाही.
पाकळ्याच्या संख्येकडे लक्ष गेलं.
ती होती पाच, सहा, सात, आठ.
हा शोध आमच्यासाठी नवीन होता.
पाकळ्यांची संख्या समान नसते तर.
नंतर तज्ञांकडून माहिती मिळाली की काही फुलांमध्ये असं दिसून येतं.
त्यातील एक पारिजातक.
पाचपर्यंत सडा पूर्ण पडला नव्हता.
पण मुले व त्यांचे पालकही आता कंटाळले असतील असं गृहीत धरून मुलांना झोपायला सांगितलं.
आजचा दिवस झोपून काढा. अभ्यासाला सुट्टी द्या आज.
(हेवा वाटत असेल ना मुलांना प्रबोधिनीत शिकत असल्याबद्दल. शिक्षक काय सांगतात; तर दिवस झोपून काढा. वा!)
दुसऱ्या दिवशी या चौघांची एक बैठक घेतली.
प्रत्यक्ष संवादातून निरीक्षणे समजून घेतली.
न राहवल्यामुळे दोन आई पालकांनी पण उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
त्यांनाही खूप छान वाटलं होतं.
राघवची आईम्हणाली, “दादा १२ च्या सुमारास झाड पूर्ण डवरलेलं असतं. सुगंध भरून राहिलेला असतो सर्वत्र.”
ज्यांच्या अंगणात, दारासमोर पारिजातक आहे त्यांनी एकदा तरी ही १२ ची वेळ नक्की गाठा.
करोनाला खिजवल्यासारखे होईल.
राधा प्रथमच पूर्ण रात्र जागली होती.
तिला त्याचंच खूप कौतुक वाटत होतं.
एकंदर मुले खुश होती.
मग मुलांना अजून काही प्रश्न, कृती दिल्या मी.
त्यातील एक म्हणजे रात्री ८ ते ९ मध्ये उमलणाऱ्या फुलांना रंग लावा. पहाटे ४ वाजता उठून ती फुले कधी गळून पडतात ते पहा. फुले झाडावर साधारण किती तास असतात तेही शोधू आता. तसेच काही फुले घरात आणून ठेवा. ती किती तासांनी कोमेजतात ते बघा…इ. इ.
दोन दिवसांनी मुलांची निरीक्षणे गटावर आली.
एक छोटुसा प्रकल्प पूर्ण झाला होता.
साधारणपणे…
पारिजाताकाची फुले सायंकाळी ६.३० ते १०१०.३० पर्यंत उमलतात.
रात्री १२ वाजता झाड आकारानं मोठ्या झालेल्या फुलांनी पूर्ण डवरलेलं असतं.
त्यावेळी सर्वाधिक सुगंध जाणवतो.
फुले सुमारे ९ ते १० तास झाडावर असतात.
पहाटे ३ ते सकाळी ६६.३० पर्यंत मुख्य सडा पडतो.
उशिरा उमललेली काही फुले सकाळी ९ ते १० पर्यंतही पडत राहतात.
घरात वाटीत पाणी घेऊन ठेवलेली फुले अगदी संध्याकाळपर्यंत ताजी राहतात.
…………………………………………….
दोन दिवसांनी अनिषाचा msg आला.
दादा काल रात्री पाऊस पडला तर फुलांचा आकार नेहमीपेक्षा लहान वाटला.
मुलांची नजर स्वतःहून गोष्टी टीपू लागली होती तर.
आमचं काम संपलं होतं.
……………………………………………..
रात्री गळून पडणाऱ्या शुभ्र फुलांमुळे या झाडाला ‘ट्री ऑफ सॉरो’ म्हणतात म्हणे.
आमच्यासाठी मात्र हे झाड ‘ट्री ऑफ जॉय’ ठरलं होतं.
( सहभागी विद्यार्थी –
इ. ७ वी – राधा धारवाडकर, अनिषा भोंडवे, अदिती पालपिनकर