Contact +91 20 27168000
Contact +91 20 27168000

लॉकडाऊन मधील परिसर अभ्यास – भाग ४

जलउभारी वनस्पती…
 
गच्ची बागेत गेलो होतो.
खूप म्हणजे खूपच दिवसांनी.
सेवकांनी पाणी दिल्यानं बरीच बाग तग धरून होती.
काही संपली होती.
संपली होती???
शब्द चुकतोय का माझा?
आम्ही लावलेली काही रोपंं मेली होती हे खरंंच.
पण आम्ही न लावलेल्या अनेक गोष्टी उगवूनही आल्या होत्या; हे त्याहून खरंं.
अगदी प्रत्येक कुंडी हिरवीगार होती त्यांच्यामुळंं.
किती ते प्रकार.
हा… हा घटक होईल का परिसर अभ्यासाचा? (एक मन)
यडा आहेस का रे? काहीही काय? (दुसरं मन)
ए गपा रे तुम्ही. हाच विषय घेऊ. (मी)
अरे गवत काय गवत? नाव तरी बरंं शोध जरा. (दुसरंं मन)
हं. करतो विचार. (मी)
पावसळ्यात उगवून येणाऱ्या वनस्पती.
बरं नाव सुचलं होतं ‘मी’ला.
विषय थोडा अवघडच.
कोणाची मदत घ्यायची समजेना.
परत एकदा संजीव नलावडे सरांची आठवण काढली.
परत एकदा सरांचा तत्पर प्रतिसाद आला.
सरांनी पाठवलेल्या क्रमांकावर संपर्क केला.
“ताई, मी अमुक अमुक,,, माझंं काम तमुक तमुक…”
“ठीक आहे सर. आवडेल तुम्हाला मदत करायला. पण तुम्ही ज्याला गवत म्हणता ते सगळंं गवत नाही. आमची ग्रासची व्याख्या वेगळी आहे.”
“काय?”(भाडीपा मधील अनीप्रमाणे टोन व चेहरा.)
“ताई आपण आमच्याच भाषेत बोलू. तरच बोलणंं होईल आपलंं…”
“ठीक. बोला.”
बऱ्याच गप्पा झाल्या आमच्या.
“आधी मी काही फोटो पाठवतो ताई. त्यानंतर पुढचंं ठरवू.”
दुपारी गवताचे फोटो काढायला शाळेत जायचं होतं. 
पण लक्षात न राहिल्यानंं सकाळीच आंघोळ करून बसलो. 
करोना नियम कडक आहेत आमच्या घरी…(होय तुमच्या घराप्रमाणेच)
बाहेर कितीही वेळा जा.
पण तितक्या वेळा आंघोळ करूनच घरात या. 
कोणी सांगितलंय; जाऊ उद्या म्हटलं.
थोडी स्वतःवरच चिडचिड झाली खरी. 
पण अचानक विचार आला.
एकदा स्वतःचंं अंगण तरी पाहू. 
अस्सा अंगणात आलो. 
बरंंच काही उगवलं होतंं की आमच्याही अंगणात. 
एकेका प्रकाराचा फोटो काढायला घेतला. 
तब्बल नऊ… परत सांगतो, स्वतःच्या अंगणात मला नव्यानं उगवून आलेले नऊ प्रकार बघायला मिळाले.
“बाबा, यावेळी मी सांगितल्याशिवाय गवताच्या एका पात्यालाही हात लावायचा नाही.”
राजेशाही थाटात माझा आदेश.
“हरकत नाही; तुझं काय ते झालं की तूच काढ यावेळी गवत”, बाबांचं उत्तर.
“अहो… बाबा, तसं नाही ओ…ऐका जरा…”
एकदम नरमाईच्या स्वरात पुढची बोलणी माझी.
ताबडतोब हे सगळे फोटो ताईंना पोस्ट केले.
उशिरानंं ब्ल्यू टीक झाली.
रात्र झाली होती पण न राहवल्यामुळे फोन केलाच शेवटी. 
“ताई फोटो बघितले ना?”
“हो हो. बोलेल मी त्यांच्याविषयी.”
“ओळखता आले का सगळे प्रकार?”
थोडंं चाचरतच विचारलंं. 
“होय. सांगेन माहिती. त्यात काही गवत तर काही तण आहे.”
“बरं. बरं.”  
(आमच्यात गवतालाच तण म्हणतात ओ. पण अज्ञान तरी किती उघड करायचं म्हणून गप्पच राहिलो.)
“शाळेमध्ये आणखी काही प्रकार आढळले तर फोटो पाठवतो. पण लवकर वेळ काढा ताई,” असं म्हणून फोन ठेवून दिला.
थोडा घाईतच.
होय परिचय करून दिलेला नाहीये.
ताईंचंं नाव डॉ. राणी भगत.
प्राध्यापिका आहेत. पीएचडीच्या गाईड आहेत. मूळच्या बारामतीच्या. बारामती तालुक्यातील फ्लोरावर यांचंं पुस्तक प्रकाशित झालंंय. याच प्रकारचंं काम मुळशी तालुक्यात केलंय यांनी. आणि सध्या मधुमेहावर वनौषधी संशोधनाचंं काम सुरूए.
दुसऱ्या दिवशी शाळा गाठली.
साडेचार एकराचा कानाकोपरा तपासला.
बरंंच काही दिसलं अपेक्षेप्रमाणंं.
कॅमेरात पकडलं आणि पोस्ट केलं.
आता ताईंंच्या फोनची वाट पाहणंं होतं. 
हातातील कामं संपवून यासाठी वेळ काढायला दोन आठवडे लागतील असं कळवलं होतं ताईंनी.
तोवर कुठं धीर धरतोय.
नेट धुंडाळलं मग.
गवत ओळखण्याची एक सोपी खूण समजली.
पानांवरील शिरा समांतर असतात.
अंगणातील ९ पैकी २/३ च प्रकारचीच पानंं अशी दिसली.
हे नक्की गवत.
एकदाचा व्याख्यानाचा दिवस ठरला.
आधी एकदा ppt पाहून काय घ्यायचंं, काय न घेऊन चालेल अशी चर्चा झाली आमची.
७ वीची इयत्ता नक्की केली आम्ही.
ताईंंना वनस्पती शास्त्रातील मराठी नावंं सुचायला जरा जडच जात होतं.
स्वाभाविक होतं म्हणा.
मुलांच्या पाठ्यपुस्तकाची pdf ताईंंना पाठवली.
त्यात वनस्पतींशी संंबंधित एक धडा होता.
मुलांचंं पूर्वज्ञान ताईंंना समजावंं या हेतूनं.
व्याख्यान फारच सुंदर झालं.
आणि हो, व्याख्यानात इंग्रजी शब्द शोधावे लागत होते.
ताई एकदम जय्यत तयारीत आल्या होत्या.
वनस्पतींंचे प्रकार, त्यांचे अवयव, त्या अवयवांचे प्रकार…
खूपच इंटरेस्टटिंंग आहे ओ सर्व.
म्हणजे भारतात तब्बल १८५०० सपुष्प वनस्पती आढळतात.
सूर्यफूल हे एक फूल नसून अनेक फुलांचा गुच्छ आहे.
द्विदल वनस्पतीत फुलांच्या पाकळ्यांची संख्या ४ किंवा ५ च्याच पटीत असते…
“ताई, गवत आणि तण यातील फरक सांगताय ना?”
“सोप्पं आहे. ज्वारीच्या शेतात आंब्याचं रोप आलं तर ते तण. आणि गवत ओळखण्यासाठी ऊस समोर आणायचा. उसासारखी पेर व कांडे अशी रचना दिसली तर ते गवत.”
ऐका ना लोकहो.
हे सगळंं सोडा.
तुमच्या अंगणात कुंडीत सदाफुली असेल ना? 
जरा सदाफुलीची पाने देठावर कशी आली आहेत बघता का? 
तुमच्याकडे कढीपत्त्याचं रोप आहे का? 
त्याच्या व अन्य संयुक्त पानात काय फरक आहे शोधता का?
वेळ काढून पहा तरी.
एकेक गोष्ट लक्षात येत जाईल;
आणि मस्त वाटेल एकदम.
यावेळी अभ्यासाचा पॅॅटर्न जरा बदलला आम्ही.
आधी व्याख्यान.
मग त्यावर आधारित प्रश्नावली, उत्तरांच्या निमित्ताने चर्चा, व्याख्यानाची उजळणी.
यात वर्षाताईंनी छान लक्ष घातलं.
राणीताईंनी व्याख्यानाचं  ppt पाठवलं होतं.
पण ते थोडं बाजूला ठेवलं.
मी काढलेले फोटो स्मिताताईंकडून  ppt मध्ये लावून घेतले.
नावे राणीताईंना विचारून घेतली. 
आणि हे ppt पाठवून त्यातील आपल्या परिसरात काय काय सापडतंय याचा शोध घ्यायला लावला मुलांना.
ज्यांचा फुलोरा अद्याप आला नाही; त्यांच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं.
नवीन काही असेल तर त्याचाच फोटो पाठवायचा होता.
यावेळी मात्र ppt पुरलं मुलांना.
एकही फोटो आला नाही. 
सुमारे ३२ प्रकार समजले मला पावसाळी वनस्पतींचे.
मुलांचा अभ्यास चालू आहे.
……………………………..
आजकाल मला किराणा, भाजी आणणे ही कामंं आवडायला लागली आहेत.
त्यानिमित्तानंं घराबाहेर पडल्यावर रस्त्याच्या कडेनंं, लोकांच्या दारात काय उगवलंय ते पाहता येतं.
पण लोकांच्या दारात थांबून मास्क लावलेल्या अवस्थेत गवताचे फोटो काढताना जरा विचित्रच वाटतं.
लोकांना ओ; मला नाही.
……………………………..
हा पहिलाच पावसाळा; कोणतीच सहल काढता न आलेला.
आतून अस्वस्थता यायला लागली होती.
“बाबा, घरामागच्या मैदानात इतकं काही दिसतयं; मैदानात जा की.”
वाक्याच्या सुरावरून; लोकांच्या दारात कशाला जाताय; हे लेकीनं न उच्चारलेलंं वाक्य नीट ऐकू आलं मला.
पण म्हणणं अगदीच बरोबर होतं तिचं.
मुले नसल्यानं मैदानावरील माती दिसेनाशी झाली होती.
केवळ हिरवगार होतं मैदान.
पावसानं उघडीप घेताच मैदान गाठलं.
दोन तास रमलो तिथंं.
खूपच काही दिसलं.
कीटक, फुलपाखरंं, रानफुले, गवत…
म्हणजे तज्ज्ञ सोबत असतील तर अगदी दिवसभराची क्षेत्र भेट होईल इतकं.
आज मन प्रसन्न होतं.
मस्त क्षेत्र भेट झाली होती.
आधी सगळं नुसतंच हिरवंगार दिसायचं.
आता त्यातील प्रत्येक पातं बोलू लागलंं आहे.
……………………………..
राणीताईंचंं व्याख्यान झाल्यावर प्रणितानं एक प्रश्न विचारला होता,
“ताई, उन्हाळ्यात सगळं सुकून, काही ठिकाणी तर आग लागून जळून जातं. तरी पावसळ्यात परत कसं उगवतंं?”
मस्त होता प्रश्न.
ताईंनी शास्त्रीय भाषेत उत्तर दिलं. 
आणि शेवटी म्हणाल्या म्हणून तर या वनस्पतींना जलउभारी असं म्हणतात.
वा!
काय नाव आहे ना.
प्रतिकूल परिस्थती असेपर्यंत तग धरून राहण्याचा आणि अनुकूल परिस्थती निर्माण होताच उभारी घेण्याचा गुण गवताकडून घेतलाच पाहिजे की.
……………………………..
“दादा तुम्ही विज्ञानाची शाखा घ्यायला हवी होती,” अध्यापक बैठकीत एका ताईंनी फिरकी घेतली.
“अहो बरंं झालं नाही घेतली. उगा पाठ्यपुस्तकंं शिकवत राहिलो असतो,” मी थोडीच बोल्ड होतोय!
……………………………..

शिवराज पिंपुडे 
विभाग प्रमुख,
पूर्व माध्यमिक विभाग,
ज्ञान प्रबोधिनी, निगडी केंद्र

Leave a Reply