Contact +91 20 27168000
Contact +91 20 27168000

Phone – a – friend …. भाग – १

phone a friend covid helpline

Phone – a – friend …. भाग – १

कौन बनेगा करोडपती या टीव्ही मालिकेत एक लाईफलाईन असायची … हॉट सीटवरच्या स्पर्धकाला एखाद्या प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर तो एक फोन करून हे उत्तर मिळवू शकत असे आणि त्याद्वारे स्वतःला बाद होण्यापासून वाचवू शकत असे. आत्ता हे सगळं आठवायचं कारण म्हणजे आपली सेवावाहिनी. यावर आपल्याला फोन तर येत आहेतच पण आपल्याकडून फोन जात देखील आहेत … प्रबोधिनी कुटुंबातील सदस्यांना.

त्याचं झालं असं की आपल्याकडे तब्बल ८५० गूगल फॉर्म भरून तयार होते आणि ८-१० जणांचा एक गट कामाला इच्छुक होता. शिवराजदादाने सांगितले की या सगळ्यांना आपण फोनवर संपर्क करूया आणि त्यांना वैद्यकीय , मानसिक , आर्थिक किंवा अन्य मदतीची गरज आहे का हे जाणून घेऊया. त्याने ताबडतोब १०० जणांची यादी एकेका सदस्याला दिली आणि रोज १० जणांना संपर्क करायला सांगितले. आता यांना फोन केल्यावर काय बोलायचं , कशी सुरुवात करायची , त्यांना कसं बोलतं करायचं इत्यादी सगळ्या गोष्टींचा विचार झाला. अनघाताईने एका झूम बैठकीत सगळ्यांना याबाबत सगळं सविस्तर आणि नेटकं समजावून सांगितलं. एक दोन डमी फोन कॉल्स सुद्धा करून बघितले आणि आता सगळे सज्ज झाले फोनवर संपर्क करायला.
आज यातल्या दोघींची फोनकॉल्सची सेंच्युरी पूर्ण झाली आहे. अनुजाताई भंडारी (संगणक विभाग प्रमुख) आणि संपदाताई पटवर्धन (माजी पालक आणि आजीवन सदस्य) या दोघींचे आज तब्बल १०० फोन करून पूर्ण झाले. यातल्या काही जणांना या दोघी ओळखत होत्या तर काही जण पूर्णपणे अनोळखी. पण आपल्याकडून त्यांना फोन गेला की ते भरभरून बोलले. काही जण म्हणाले की प्रबोधिनी ही एक आगळीच शाळा आहे , चक्क मे महिन्याच्या सुट्टीत शिक्षक – पालक फोन करतायंत , आपुलकीने विचारपूस करत या अवघड परिस्थितीत आधार देत प्रबोधिनी प्रत्येक सदस्याच्या मागे भक्कमपणे उभी आहे हे सांगतायंत हे आम्हाला खूप भारी वाटतंय. काही जणांचं नैराश्य तर निव्वळ फोनवर बोलूनसुद्धा कमी होत होतं. काही जण गावी होते तिथेच त्यांनी आपला फोन रिसिव्ह केला आणि तिथल्या आप्तेष्टांना सांगितलं देखील की हे बघा माझं कुटुंब … मी इकडे आहे तरी माझी काळजी घेतंय.

एक जण तर ऑफिसमध्ये असताना फोनवर बोलले तेही तब्बल अर्धा पाऊण तास. त्यांनी स्वतःचे आई वडील आणि सासू सासरे असे चारही आधारस्तंभ कोविडमध्ये गमावले होते. घरात बायको मुलांसमोर खंबीर राहण्याचं नाटक करत होते. बहीण परदेशात त्यामुळे तिलाही त्रास होऊ नये म्हणून जास्त काही सांगत नव्हते ते आपल्या ताईंशी मनमोकळे बोलले. अगदी बहिणीशी – ताईशी बोलावं असं… मणभर साचलेलं मनभर बोलल्यानंतर निवळून गेलं.

एक ताई तर नुकत्याच मुलीसह पॉझिटिव्ह आलेल्या …. संपूर्ण बिल्डिंगमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण जास्त झाल्याने बिल्डिंग – परिसर सील … त्यांना फोन केल्यावर त्यांनी याबाबत सांगितले. लगेच आपल्या सेवावाहिनीबाबत माहिती दिली. डॉक्टरांशी संपर्क जोडून दिला. मदतीचा हात मिळाल्याचा आनंद त्यांनी दुसऱ्या दिवशी आपणहून फोन करून व्यक्त केला.
एक ताई वैद्य … स्वतः रुग्णांना सेवा देत आहेतच तरीही आपल्या सेवावाहिनीत वैद्यकीय योगदान देण्याची इच्छा स्वतःहून व्यक्त केली. मदतीचा एक हात आपोआप वाढला. एका ताईंचे बरेच सामाजिक काम होतेच ते त्यांनी आपल्याशी share केले. अनेकांना तर हा फोन समुपदेशनासाठी आला आहे असं वाटून गेलं व त्यांच्या मनावरचा ताण आपल्या फोनने नकळत हलका केला.

एक ना दोन … पुष्कळ अनुभव … पण समान धागा एकच … आपलं कुटुंब … प्रबोधिनी परिवार … सेवावाहिनी ….या प्रेमाच्या , आपुलकीच्या धाग्याने आपण सर्वजण बांधले गेलो असल्याने आज लांब असलो तरी मनाने जवळ आहोत ही प्रचिती ठायी ठायी येत होती. नित्य नवे अनुभव सगळे जण गटावर व्यक्त करत आहेत आणि हे सर्व संकलित करण्याचे काम पद्मजाताई थिटे (क्रीडाकुल प्रमुख) करत आहेत. रोज किती जणांशी फोनवर संपर्क झाला , कुणाचे नंबर लागले नाहीत , कुणाला कुठल्या मदतीची आवश्यकता आहे , कोण मदत करायला इच्छुक आहे , आपण सेवा पुरवली असेल तर त्यावर त्यांचा प्रतिसाद काय , कुटुंबातील सगळे ठीक आहेत ना इत्यादी जे रोजचे अपडेट्स असतात ते पद्मजाताई एक्सेल शीटमध्ये भरून डॅशबोर्ड सतत हलता ठेवतात. आपल्या दोघी ताईंची फोन कॉल सेंच्युरी पूर्ण झाल्याचे पण त्यांनीच आपल्याला सांगितले बरं का.
तर आपली ही अशी फोन अ फ्रेंड साखळी अशीच सुरू राहणार आहे बरं का … कोरोनाची साखळी तोडत आपल्याला ही मैत्रीची साखळी मात्र एकेक कडी जोडत वाढवायची आहे… दोस्ता , मित्रा , फ्रेन्डा म्हणत ……

(क्रमशः)

शब्दांकन : शीतल कापशीकर
सेवावाहिनी : 8390458155

Leave a Reply