‘ किशोरवयीन मुलांचं भावविश्व फार वेगळ असतं ‘. निरागस डोळ्यांमध्ये असलेल्या भावनांची जागा आता कुतूहल, जिज्ञासा , स्पर्धा, चढा ओढ , आत्मविश्वास यांनी घेतलेली असते.याच वयात एखाद्या विषयाचा जास्त, सखोल अभ्यास करून काहीतरी मिळवण्याऱ्या इच्छेची
पायाभरणी होत असते. करिअर ,पुढील आयुष्यातील ध्येय याविषयीचे विचार त्यांच्या गप्पांमध्ये , मनामध्ये ,आजूबाजूच्या वातावरणामध्ये एवढेच काय तर स्वप्नांमध्ये सुद्धा येत असतात. या वयातच अभिरुची ही विशेषत्वाने वाढीस लागणारी भावना आपल्याला दिसते, किंबहुना काही ठरवून केलेल्या प्रयत्नांनी ती वाढवता सुद्धा येते. असाच एक ठरवून केलेला प्रयत्न म्हणजे ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयात इयत्ता ९वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या अभिरुची तासिका.
शिक्षण म्हणजे तीन H – हेड, हार्ट आणि हँड.
विचार करायला लावते ते शिक्षण , प्रत्यक्ष कामाची प्रेरणा देते ते शिक्षण आणि याही पुढे जाऊन म्हणेन एखाद्या विषयावर प्रेम करायला लावते ते शिक्षण.
असाच प्रयत्न संस्कृत अभिरुची गटात विद्यालयातील संस्कृत अध्यापकांनी संस्कृत विषयात आवड असणाऱ्या इ.९वी च्या २१ विद्यार्थ्यांवर ६ आठवडे केला. आवड ते अभिरुची हा प्रवास ६ आठवड्यात पूर्ण करणे शक्य नाहीच ; परंतु अफाट संस्कृत साहित्यातील या वयोगटाला साजेसे असे आचार्य भर्तृहरीकृत नीतिशतकातील निवडक २१ श्लोक निवडून या प्रवासाला आम्ही सुरुवात केली. सध्याच्या स्पर्धेच्या युगात देववाणी असलेल्या आणि सर्वच जगाला सर्वच स्तरावर मार्गदर्शन करण्यास समर्थ असलेल्या संस्कृत भाषेची गोडी लावण्यासाठी हा प्रवास ज्ञानदायी पण रंजक करण्यासाठी अध्यापकांनी नीतिशतकातील श्लोकांकडे किती किती दृष्टिकोनातून पाहता येईल याचा विचार केला. ठिकाण एकच असले तरी त्या ठिकाणापर्यंत जाण्याचे रस्ते वेग- वेगळे तेही आवडीने निवडलेले आणि रस्त्यावर दिसणाऱ्या घटकांकडे आपल्या आवडीनुसार बघण्याची मुभा असेलेले असतील तर प्रवास कोणालाच कंटाळवाणा वाटत नाही . अशाच पध्दतीने नियोजन करून अध्यापकांसोबत विद्यार्थ्यांनी हा प्रवास केला. नीतिशतकातील निवडलेल्या श्लोकांकडे किंबहुना संस्कृत साहित्यातील उपलब्ध श्लोकांचा अभ्यास करतांना तो कशा पद्धतीने करता येईल? याचा एक नमुना पाठच विद्यार्थ्यांना या निमित्ताने देता आला.
हे पुस्तक म्हणजे सध्याच्या तंत्रज्ञान युगात आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिक तंत्रस्नेही झालेल्या अध्यापक आणि विद्यार्थ्यांनी आपल्या केलेल्या अभ्यासाला शब्दांमध्ये तसेच तंत्रज्ञानाच्या विविध माध्यमांमध्ये ( ध्वनिफीत , चित्रफीत , Q.R. कोड ) बद्ध करण्याचा केलेला प्रयत्न आहे असे म्हणता येईल.
या पुस्तकात ‘ नीतिशतक – जगण्याची एक कला ‘ या शीर्षकांतर्गत विद्यार्थी या २१ श्लोकांतून ही कला कशी शिकलेत? हे मांडलेले आहे. भर्तृहरीची शतककाव्ये
मुक्तकाव्यात कशी मोडतात ? मुक्त काव्य म्हणजे काय?
या प्रश्नांची उत्तरे शोधत असताना संस्कृत साहित्य केवढे समृद्ध आहे ? याचा परिचय करून देण्यासाठी संस्कृत साहित्याचा परिचय पुस्तकाच्या सुरुवातीला थोडक्यात करून दिलेला आहे .त्यानंतर आचार्य भर्तृहरींचा जीवन परिचय आणि नीतिशतका बद्दलची सामान्य माहिती आपल्याला पुढे वाचायला मिळेल. त्यानंतर ज्या २१ श्लोकांची निवड केलेली आहे त्या २१श्लोकांचा विद्यार्थ्यांनी विविध स्तरावर केलेला अभ्यास आपल्याला पहायला मिळेल. यात तो श्लोक ,अन्वय आणि त्याचा अर्थ समजून घेता येईल. यांच्यासोबतच रंजकपणे मांडलेल्या त्या श्लोकावर आधारित विविध कृती वाचकाला आनंद देऊन जातील.
यातीलच काही श्लोकांचा भावार्थ अभिरुची गटातील विद्यार्थ्यांनी कथेच्या ,नृत्याच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे .त्यांची ध्वनिफीत आणि चित्रफित तुम्हाला तंत्रज्ञानाच्या साह्याने इथे बघता येईल. शेवटी भर्तृहरीने आम्हाला जगण्याची कला नेमकी कशी शिकवली ? विद्यार्थी जीवनात भर्तृहरीच्या श्लोकांचे किती महत्त्व आहे? हे प्रत्यक्ष भर्तृहरीं पर्यंत पोहोचवण्यासाठी विद्यार्थ्यांनी पत्रलेखनाचा आधार घेत आपल्या भावना भर्तृहरी पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभिरुची गटात काम करत असताना माझा पाल्य काय काय शिकला ? याविषयीचे काही पालकांचे बोलके अभिप्राय आपल्याला या पत्रानंतर वाचायला किंवा ऐकायला मिळतील . पुस्तकाच्या शेवटी अध्यापक सुद्धा विद्यार्थी असतो आणि तो पण आपल्या अध्यापनातून अनेक गोष्टी शिकत असतो याचा जो काही प्रत्यंतर आला आहे तो मांडला आहे. संस्कृत भाषेच्या उज्ज्वल अभ्यासाची नांदी या प्रकल्पातून कशी झाली? हे उपसंहारातून मांडून लहान कार्याचा उपसंहार हा मोठ्या कार्याची नांदी असतो असा प्रामाणिक भाव आपल्या पर्यंत पोहोचविला आहे.
हे पुस्तक नक्कीच तुम्हाला वाचायला आवडेल अशी खात्री आहे. धन्यवाद !!!